Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईMumbai Fire : फेअरमाँट हॉटेलमध्ये भीषण आग, 80 जणांची सुखरूप सुटका

Mumbai Fire : फेअरमाँट हॉटेलमध्ये भीषण आग, 80 जणांची सुखरूप सुटका

Subscribe

दक्षिण मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळील मरीन चेंबर इमारतीत आज (22 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. यानंतर विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल क्रमांक - 2 नजीक असलेल्या 10 मजली हॉटेल फेअरमाँटच्या टेरेसच्या भागात सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

मुंबई : दक्षिण मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळील मरीन चेंबर इमारतीत आज (22 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. यानंतर विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल क्रमांक – 2 नजीक असलेल्या 10 मजली हॉटेल फेअरमाँटच्या टेरेसच्या भागात सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे हॉटेलमध्ये आणि परिसरात खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अनेकांनी सुरक्षिततेसाठी हॉटेल इमारतीच्या बाहेर धाव घेतली, तर आग लागल्याने हॉटेलच्या इमारतीमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या 80 नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच सुखरूप सुटका केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (80 people rescued from massive fire at Fairmont Hotel in Vile Parle)

मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, विलेपार्ले (पूर्व), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बेसमेंट, तळमजला अधिक दहा मजली हॉटेल फेअरमाँटमध्ये टेरेस भागात आज सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच हॉटेलच्या इमारतीमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिकांनी जीवाच्या भीतीने इमारतीबाहेर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला, तर हॉटेलमधील विविध ठिकाणी 80 जण अडकून पडले होते. दरम्यान, आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. तोपर्यंत हॉटेलच्या इमारती समोरील रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ इमारतीमध्ये अडकलेल्या 80 लोकांची सुखरूप सुटका केल्याने ते थोडक्यात बचावले.

हेही वाचा – Fire In Mumbai : दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स येथील मरीन चेंबर्समध्ये भीषण आग

तासाभरात आगीवर नियंत्रण

सदर आग हॉटेलच्या एसी युनिट आणि एक्झॉस्ट डक्टिंगमध्ये लागली होती. यानंतर आग अंदाजे 1,000 ते 1,500 चौरस फूट क्षेत्रात पसरली. आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाने सायंकाळी 5.42 वाजता आग स्तर – 1 ची असल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाने 3 फायर इंजिन, 3 जंबो वॉटर टँकर, हाय प्रेशर पंप यांच्या साहाय्याने सदर आगीवर नियंत्रण मिळविले. सायंकाळी 6.50 वाजता संपूर्ण आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले, मात्र आग का आणि कशी काय लागली? याबाबत अग्निशमन दलाचे आणि पोलिसाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा – Attack On ST Bus : आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, सरनाईकांचा कर्नाटकला इशारा


Edited By Rohit Patil