Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईAaditya Thackeray : भाजप हिंदुत्वाचा वापर फक्त निवडणुकीसाठी करते, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray : भाजप हिंदुत्वाचा वापर फक्त निवडणुकीसाठी करते, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : माघी गणपती सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली. यानंतर अनेक गणेशमंडळांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आदित्य ठाकरे आक्रमक भूमिका घेत भाजपवर टीका केली आहे. हिंदुत्वाचा वापर नेहमीच भाजप हा मतांसाठी करतो, असा गंभीर आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. माघी गणेश मूर्तींच्या विसर्जनाच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेत भाजपवर टीका केली. “1 तारखेपासून माघी गणपती आहेत, हे मुंबई महानगरपालिका, राज्य शासन आणि पोलिसांना माहिती होते. असे असतानाही ज्या मंडळांना, परवानगी तुमच्याच पोलिसांनी, तुमच्याच पालिकेने दिलेली आहे, त्यांच्यासाठी किमान तुम्ही कोर्टाकडे माघी गणेशोस्तवासाठी सूट मागणे गरजेचे होते,” असे म्हणत टोला लगावला. (Aaditya Thackeray Shivsena UBT on Maghi Ganpati Visarjan criticized BJP Govt)

हेही वाचा : Raju Patil : निळजे उड्डाणपूल वेळेत पूर्ण, पण पलावा पूल रखडला; राजू पाटील यांचा शिंदेंवर निशाणा 

“गणपती विसर्जनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही राज्य सरकारने अध्यादेश काढला, बिल आणली आणि ती बदलून घेतली. याबाबतचा अंतरीम आदेश आल्यानंतरही 12 दिवस उलटून गेले आहेत. 30 जानेवारीला याबाबतचे आदेश आल्यानंतर मुंबई महापालिकेने नेमकी काय तयारी केली? असा सवालही त्यांनी केला. पोलिसांनी या गणेश मंडळांची बैठक बोलावली होती का? काही पर्यायी व्यवस्था केली होती का? आमच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. मात्र, त्या तलावात मोठ्या गणेशमुर्तींचे विसर्जन होणार आहे का?” असा सवालही त्यांनी केला.

“भाजप हिंदुत्वाचा वापर फक्त निवडणुकीसाठी करत आहे. त्यानंतर हिंदुकडे भाजप दुर्लक्ष करते. याची अनेक उदाहणे दिसून आली आहे. मिंधेंचे आमदार असलेल्या सदा सरवणकर यांनी 2023 मध्ये गणेशोत्सवातील मिरवणुकीवर बंदूक रोखली होती. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरही गोळी झाडली होती. तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, गोळी झाडली गेली आहे. पण, कोणी झाडली हे स्पष्ट झालेले नाही. त्याचा अभ्यास सुरू आहे. सरवणकर यांच्यावर युएपीएसारखा कायदा लागू करण्याची गरज होती. त्यांनी हिंदूच्या मिरवणुकीवर बंदूक रोखली होती. मात्र, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारने सरवणकर यांनी सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष केले,” अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

“भाजपच्या राज्यात गणेश विसर्जन रोखण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. आगामी गणेशोत्सवात पीओपीच्या मुर्त्यांबाबत सरकारचे काय धोरण असेल? पर्यावरणासाठी पीओपी मुर्त्यांवर बंदी घालायची असेल तर त्याला पर्याय काय, यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी माहिती देण्याची गरज आहे. आता गणेश मुर्त्या विसर्जनासाठी पोलिसांच्या माध्यमांतून मंडळांवर दबाव टाकण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मंडळांशी चर्चा केली होती का? सरकारने यामध्ये भूमिका घेण्याची गरज आहे. पर्यावरणाची समस्या, विसर्जनानंतर गणेशमुर्त्यांचा अवमान या विषयांवर मार्ग काढता आला असता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मंडळाशी चर्चा केलीच नाही. आता आगामी गणेशोत्सवासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, ही आमची मागणी आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.