मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी सादर केला. हा अर्थसंकल्प 74,427.41 कोटी रुपये आकारमान असलेला, मुंबईकरांना अधिकाधिक सेवासुविधा, नवीन प्रकल्प, योजना, विकासकामे देणारा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “धारावीत छोट्या दुकानदारांवर मालमत्ता कर लादला जाणार आहे, हा अदानी कर आहे,” अशा शब्दात टीका केली आहे. पत्रकार परिषद घेत आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “भाजपकडून मुंबईची एक वेगळ्या प्रकारची पिळवणूक सुरू आहे. आजचा अर्थसंकल्प पाहिला तर त्यामध्ये अनेक गोष्टी धक्कादायक आहेत. मुख्य म्हणजे अर्थसंकल्पात अदानी हे नाव दिसते. तसेच अर्थसंकल्पात छोट्या दुकानांवर आता कर लावला जाणार असल्याचे सांगितले आहे. हे कोणासाठी चाललंय? का चाललंय?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. (Aaditya Thackeray Shivsena UBT on Mumbai Budget 2025)
हेही वाचा : BMC Budget 2025 : बीएमसीचा मुंबईकरांना दिलासा, अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
“जेव्हा आमचे महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा आम्ही मुंबईमधील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ केला. पण, आज महायुतीच्या सरकारने मुंबईत अदानींसाठी दुकानांवर प्रॉपटी कर असा एक वेगळा कर लावला जात आहे. पुढेही असाच कर प्रत्येक घरांवर आणि झोपडपट्टीत लावला जाणार आहे. मग हा अदानी कर नाही तर काय आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “धारावीमधील लोक दुसरीकडे जाण्यास तयार नसून त्यांना संपूर्ण माहिती हवी आहे. मुख्य म्हणजे अदानी अक्षरश: मुंबईला लुटत आहेत. अदानींना लोक नाकारत असून विरोध म्हणून लोक त्या ठिकाणी राहतात. पण, आता त्यांच्यावर कर लावला जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे डंपिंग ग्राउंड अनियमितपणे अदानीने हडपलेले आहे. तेच डंपिंग ग्राउंड आता मुंबई महापालिकेने घ्यायचे आणि अडीच ते तीन कोटी मुंबईकरांचा खर्च करायचा. तसेच, पुन्हा तेच डंपिंग ग्राउंड स्वच्छ करून द्यायचे, असे सर्व प्रयत्न सुरू आहेत.” असा दावा त्यांनी यावेळी केला.
आज @mybmc च्या अर्थसंकल्पाविषयी प्रसारमाध्यमांसमोर मांडलेले मुद्दे:
• झोपडपट्टीतील दुकानदारांवर प्रस्तावित कर लावणे, हा मोठा अन्याय आहे. हा निर्णय केवळ धारावी अदानी समूहाच्या घशात घालता यावी, ह्याकरिता घेण्यात आलाय!
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री… pic.twitter.com/1qjk9jKFpF
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 4, 2025
“पालिकेला आपण जो कचरा देणार त्यावरही आता हे सरकार कर लावणार आहे. हे जर थांबले नाही तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू. मुंबईकरांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही.” असा इशारा आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. “अडीच ते 3 हजार कोटी रुपयांचा बोजा मुंबईकरांवर पडणार, कारण अदानीला देवनार डम्पिंग ग्राऊंड स्वच्छ करून हवे आहे. अदानीकडूनच धारावीचा साडे 7 हजार कोटी रुपयांचा प्रीमियम पालिकेला येणार आहे, त्याचा कुठेही उल्लेख या अर्थसंकल्पात मी पाहिलेला नाही. हे धक्कादायक तसेच धोकादायक आहे. मुंबईकरांनी पाण्याचे बील, किंवा विजेचे बील नाही भरले तर तुमचे कनेक्शन तोडतात ना. मग अदानीने जर जमीन ढापली, कर ढापले आणि आपल्याच करातून जमीन घ्यायला लागले प्रीमियम न भरता तर मग मुंबईत अदानीला कोण रोखणार? भाजप आपल्या मालकाला रोखणार का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.