मुंबई : महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ बांधण्यात येत असलेल्या डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपुलाची कामे पावसाळ्यात देखील सुरूच ठेवण्यात यावी. या कामात अडथळे ठरलेल्या झाडांचे संरक्षण करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. महालक्ष्मी येथील उड्डाणपूल कामाची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी आज (26 फेब्रुवारी) महालक्ष्मी येथे भेट देत पाहणी केली. तसेच 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. (Abhijit Bangar directs to continue flyover work at Mahalaxmi even during monsoon)
महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. विकास नियोजन आराखड्यानुसार सुरू असलेल्या या उड्डाणपुलांच्या कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. सदर पुलांचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे, पावसाळ्याच्या कालावधीत कामे खोळंबणार नाहीत, याची दक्षता बाळगावी. तसेच 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी आतापासून नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी पालिका यंत्रणेला दिले.
महालक्ष्मी येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी विकास नियोजन आराखड्यानुसार मुंबई महापालिकेच्यावतीने दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांमुळे वाहतुकीचे नियमन सुरळीत होणार आहे. केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा ‘केबल स्टेड पूल’ हा रेल्वे रूळांवरील महापालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी 803 मीटर तर रुंदी 17.2 मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी 23.01 मीटर इतकी आहे. तसेच, उत्तरेकडे ई. मोझेस मार्ग ते वरळीकडून धोबी घाट मार्गावरील उड्डाणपुलाची लांबी 639 मीटर आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामात येणाऱ्या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने उड्डाणपुलाच्या संरेखनात योग्य ते बदल केले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वााच – Mumbai : साकीनाका परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, वाचा सविस्तर
केबल स्टेड पुलास आधार देण्यासाठी 78 मीटर उंच पायलॉन (मोठा खांब) उभारावा लागणार आहे. त्यासाठी अंदाजे 200 दिवस म्हणजेच 7 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्याचबरोबर केबल स्टेड पुलाच्या दोन्ही बाजूंचे काम एकत्रितपणे करावे लागणार आहे. रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने टप्प्याटप्प्याने कायर्वाही केली जाणार आहे. केबल पुलाच्या स्पॅन बांधकामासाठी सुमारे 250 दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. याचा विचार करता बांधकामासह पुलाची अनुषंगिक कामे 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण व्हायला हवी. यासाठी कामांचे वेळापत्रक निश्चित करावे. तसेच, हे करत असताना शक्य असेल तेव्हा एकाचवेळी दोन कामे एकत्रित (ओव्हरलॅपिंग) करावीत, जेणेकरून वेळेची बचत होईल. पावसाळ्यात कामे थांबणार नाहीत, अशादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश अभिजित बांगर यांनी दिले.
त्याचप्रमाणे, सदर पुलाच्या संरचेमुळे काही घरे/ आस्थापना बाधित होत आहेत. त्याची कार्यवाही संबंधित विभागांनी (वॉर्ड) पूर्ण करावी. जेणेकरून पुलाचे काम पूर्ण करून पुरेशा रूंदीचा पूलाच्या बाजूचा रस्ता (स्लीप रोड) वाहतुकीसाठी उपलब्ध करून देता येईल. वाहतूक वळविल्यानंतर पर्यायी रस्ता सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी, असेदेखील निर्देश अभिजित बांगर यांनी दिले.
हेही वाचा – CM Fadnavis : विधिमंडळ समित्यांवर फक्त भाजप आमदारांची नियुक्ती; शिंदे, अजित पवारांचे काय?