मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे विदारक फोटो सोमवारी समोर आले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांना पदमुक्त केले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असला तरी संतोष देशमुख हत्याकांड आणि ज्या खंडणीसाठी ही हत्या झाली त्याचे आरोप धनंजय मुंडे यांचा पिच्छा पुरवत आहेत. आमदार सुरेश धस यांनी आरोप केला आहे की, सातपुडा या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी बैठक झाली. तीन कोटींची प्रथम मागणी झाली. त्यानंतर दोन कोटींवर डील पक्की झाली. त्यातील 50 लाख रुपयांचा पहिला हप्ता निवडणुकीपूर्वीच देण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. संतोष देशमुख हत्याकांडाता मुंडेंनाही सहआरोपी करावे अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.
भाजप आमदार सुरेश धस आणि विरोधकांकडून होत असलेल्या या आरोपांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठं भाष्य केले आहे. धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या शासकीय बंगल्यावर खरंच खंडणीसाठी बैठक झाली होती का? याविषयी धनंजय मुंडे यांची चौकशी का होत नाही? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.
फडणवीसांनी सातपुड्याचा उल्लेख टाळला
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘आता केंद्र सरकारने जो नवा कायदा बनवलेला आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहितानुसार पहिल्यांदा खंडणीची जी केस असते तेव्हा जर दुसरी एखादी घटना तयार होते. तेव्हा दोन घटनांना लिंक करून खंडणीच्या घटनेला आपण मोठी घटना म्हणू शकतो किंवा मास्टरमाईंड म्हणू शकतो. अशी तरतूद आपल्या कायद्यात झाली आहे. मला वाटतं की हा कायदा बनल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच बीडमधील खंडणीची घटना या कायद्यानुसार नोंदवण्यात आली आहे.
सीआयडीला एकही पुरावा मिळाला नाही
देवेंद्र फडणवीसांनी सातपुड्याच्या बैठकीचा आतापर्यंत उल्लेख तपासात आले नसल्याचे सांगत म्हटले की, ‘या तपासात सीआयडीवर कोणताही दबाव नाही. धनंजय मुंडे जर यामध्ये सामील असते किंवा एक जरी पुरावा सीआयडीला तसा मिळाला असता तर सीआयडीने कारवाई केली असती. पण माझ्या माहितीनुसार अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता आमच्या पक्षाचेही काही नेते आरोप करतात, विरोधी पक्षाचेही काही नेते आरोप करतात. पण फक्त आरोप करून काही होत नाही. कायदा हा भावनांच्या आधारे चालत नाही. लोक भावनेच्या आधारित बोलतात. आता बीडच्या प्रकरणात आम्ही एवढे पुरावे मिळवले आहेत की त्या आरोपींमधील कोणीही सुटणार नाही. तसेच कठोरातील कठोर शिक्षा त्यांना होईल’,असंही फडणवीस म्हणाले, ते टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा : Aaditya Thackeray : फडणवीसांचे मंत्री टपोरीपणा करायला लागले; गुलाबराव पाटलांवर आदित्य ठाकरे भडकले