मुंबई : बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रम हा कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. बेस्टकडे कर्मचाऱ्यांना मासिक वेतन देण्यासाठीदेखील पैशांची चणचण आहे. मुंबई महापालिकेने गेल्या 2012 पडून ते आजपर्यंत बेस्टला 11,304 कोटी 59 लाख रुपयांची आर्थिक मदत केली असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला. यंदाच्या अर्थसंकल्पात सुद्धा बेस्ट उपक्रमाला एक हजार कोटी रुपये आर्थिक अनुदान मदत स्वरूपात देण्यासाठी तरतूद करण्यात आली. या निधीमधून बेस्ट उपक्रमाने, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, नवीन बस खरेदी, वेतन , कर्ज परतफेड यासाठी वापर करायचा आहे. (BEST buses in Mumbai Fund of one thausands crore for BEST initiative)
हेही वाचा : Eknath Shinde : ‘वर्षा’वर मंतरलेल्या रेड्यांची शिंगे पुरली? एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मला वाटते…’
इलेक्ट्रिक बस गाड्यांच्या खरेदीसाठी 15व्या वित्त आयोगाकडून 1,992 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 1,742 कोटी रुपये आदा करण्यात आले आहे. तर उर्वरित 250 कोटी रुपये लवकरच बेस्ट उपक्रमास देण्यात येतील, असे डॉ भूषण गगराणी यांनी सांगितले. तसेच, मुंबईकरांची पाण्याची अधिकची तहान भागवण्यासाठी आणि पुरेसा, शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका विविध कामे हाती घेणार आहे. त्यामध्ये, महापालिकेकडून 3 हजार कोटी रुपये खर्चून गारगाई धरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून मुंबईला दररोज 440 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या धरण प्रकल्पाला वन आणि वन्य जीव मंडळाची परवानगी मिळणे बाकी असून अभियांत्रिकी कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यांनतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असून यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी 36.51 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, अमर महल ते ट्रॉम्बे जलाबोगदा, हेडगेवार उद्यान ते प्रतीक्षा नगर ढवण उद्यान परळ जलबोगदा कामे, विहार तलावांचे ओसंडून वाहणारा पाणी भांडूप संकुल येथे जलशुद्धीकरण केंद्रात वळविणे तसेच त्याचा पुन्हा वापर करणे, त्यासाठी पंपिंग स्टेशन उभारणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. भांडूप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. गुंदवली, येवई , घाटकोपर येथेही जलाबोगदे निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी अनुक्रमे 360 कोटी रुपये, 600 कोटी रुपये आणि 840 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी जलमापके नाहीत तेथे ती बसविण्यासाठी 1100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कोळीवाड्यांचा विकास
मुंबईत सायन, वरळी, माहिम इत्यादी ठिकाणी कोळीवाडे आहेत. मात्र तेथील लोकांना जुन्या घरांचा विकास करण्यात अडचणी येतात. त्यामुळे कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोळी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.