मुंबई : बेस्ट उपक्रमात भाडे तत्वावर बसगाड्या चालविणारे चालक आणि वाहक यांनी ‘समान काम, समान दाम ‘ अशी मागणी करीत एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. त्यांनी मोर्चा काढून बेस्ट उपक्रमाला इशारा दिला आहे. त्यामुळे बेस्टमधील भाडे तत्वावरील बसगाड्या कमी प्रमाणात रस्त्यावर धावल्या. मात्र बेस्ट उपक्रमाने प्रवाशांची पर्यायी व्यवस्था केल्याचा दावा केला. मात्र तरीही प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. बेस्ट उपक्रमात भाडे तत्वावरील बसगाड्यांवर काम करणाऱ्या कंत्राटी चालक आणि वाहक यांनी ‘समान कामाला, समान दाम ‘ या मागणीसाठी कामगार नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. (BEST Employees March and Symbolic Strike of Contractual Workers)
बेस्ट उपक्रमातील समकक्ष कायम व नियमित कामगारांना लागू असलेले वेतनमान व इतर सेवाशर्ती तातडीने लागू करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी आज मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) आझाद मैदान येथे मोर्चा काढला. यावेळी, कामगारांनी घोषणाबाजी केली. ‘समान काम, समान दाम ‘ ची मागणी लावून धरली. आज दिवसभरात, बेस्ट उपक्रमाला भाडे तत्वावर बसगाड्या पुरविणाऱ्या मातेश्वरी कंपनीच्या 590 शेड्युल्ड बसपैकी फक्त 308 बस रस्त्यावर धावल्या. तसेच, मारुती या बस पुरवठादार कंपनीच्या 625 पैकी 506 बस रस्त्यावर धावल्या. टाटा कंपनीच्या 340 बसगाड्यांपैकी पैकी 181 बसगाड्या रस्त्यावर धावल्या. इ-ट्रान्स या पुरवठादार कंपनीच्या 334 पैकी 309 बस रस्त्यावर धावल्या. तसेच, ओलेक्ट्रा कंपनीच्या सर्व 40 बस रस्त्यावर धावल्या. तर, स्वीच या बस पुरवठादार कंपनीच्या 50 पैकी 47 बस रस्त्यावर धावल्या. म्हणजेच 1969 शेड्युल्ड बसपैकी फक्त 1391 बस रस्त्यावर धावल्या.
हेही वाचा… Thane : नोंदणीकृत कलापथक, संस्थांनी दरपत्रकासह प्रस्ताव द्यावेत
बेस्ट उपक्रमात भाडे तत्वावर बसगाड्याचा पुरवठा करणाऱ्या मातेश्वरी कंपनीच्या वडाळा डेपोमध्ये बस चालक-वाहकांनी संपादरम्यान काही बसचे नुकसान केल्याची सांगण्यात येते. त्यामुळे बेस्टला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र भाडे तत्वावरील बसगाड्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी बेस्ट उपक्रमाने केलेल्या अटींशर्तीनुसार कोणतीही बस रस्त्यावर न धावल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीकडून प्रति बस प्रतिदिन 5 हजार रुपये एवढा दंड आकारला जातो. महिन्याच्या अखेरीस हा दंडात्मक हिशेब करून कंत्राटदाराच्या बिलातून कपात केली जाते, असे बेस्टने स्पष्ट केले आहे. तर, कामगार नेते शशांक राव यांनी शिष्टमंडळासह मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना कामगारांच्या वतीने निवेदन दिले.