BMC Budget : मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज, मंगळवारी सादर केला. हा अर्थसंकल्प 74427.41 कोटी रुपयांचा असून मुंबईकरांना अधिकाधिक सेवासुविधा, नवीन प्रकल्प, योजना, विकासकामे देणारा तसेच 60.65 कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. शिक्षण खात्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा 3955.64 कोटी रुपयांचा आहे. (bmc allots Rs 23.6 crore for crash course on cyber literacy in budget)
महापालिकेच्या आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 3,955.64 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. काळाची गरज ओळखून पालिकेने सायबर सुरक्षा अभ्यासावर भर दिला असून इंटरनेटच्या जबाबदार वापरासह आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना पालिका वर्षभर सायबर सुरक्षेचे शिक्षण देणार आहे.
सध्या सायबर धोका, घोटाळे, ऑनलाइन फ्रॉड याचा धोका लक्षात घेता महापालिकेने आपल्या शाळांमध्ये 2025-26 पासून ‘सायबर सुरक्षा अभ्यासक्रम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेटचा जबाबदार आणि सुरक्षित वापर शिकवणे, हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे. तसेच डिजिटल वर्ल्डमध्ये सावधगिरीने कसे वावरावे, याचेही शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. यासाठी पालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पातून 23.6 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा – MAITRI 2.0 : उद्योग विभागाच्या मैत्री 2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण
मंगळवारी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तेव्हा शिक्षण विभागाच्या तरतुदींतर्गत याची घोषणा करण्यात आली. यात 2025 – 26 या आर्थिक वर्षासाठी शिक्षण विभागाला 3955.64 कोटी देण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या 3497.82 कोटींच्या तुलनेत यंदा या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे.
आगामी दोन वर्षात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी महापालिका ‘व्हिजन 27’ हा उपक्रम राबवणार आहे. याअंतर्गत ‘मिशन संपूर्ण’ (Mission SAMPURN) हा सर्वसमावेशक कार्यक्रम राबवला जाणार आहे. (S – शाळांमधील पायाभूत सुविधा, A – प्रवेश, M – गुणवत्ता, P – उत्पादकता, U – शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, R – जबाबादारी, N – पोषण आणि आहार) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासोबतच, सध्या सुरू असलेल्या उपक्रमांसोबतच आणखी काही नवीन गोष्टी राबवण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणात सायबर सुरक्षेचा देखील समावेश आहे. यात विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच वैयक्तिक वापरासाठी इंटरनेटचा जबाबदार आणि सुरक्षित वापर कसा करावा, हे शिकवण्यात येईल. तज्ज्ञांच्या साहाय्याने वर्षभर हा विषय पालिका शाळांमध्ये शिकवला जाईल.
पालिका शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ म्हणाले की, संपूर्णच्या साहाय्याने आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणार आहोत. आजच्या डिजिटल युगात सायबर शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. सायबर धोका हा केवळ आर्थिक घोटळ्यांशी संबंधित नाही. आणि यात केवळ श्रीमंतांना टार्गेट केले जाते असे नाही. इंटरनेटशी संबंध येणारा प्रत्येकजण याच्या धोक्यात येऊ शकतो, असे कंकाळ म्हणाले. त्यामुळेच इंटरनेटचा जाणीवपूर्वक वापर हा आधुनिक शिक्षणपद्धतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
हेही वाचा – BMC : आरोग्य खात्यासह इतर गोष्टींसाठी बीएमसी मोडणार कोटींच्या मुदत ठेवी
सायबर शिक्षणासोबतच पालिका STEM (सायन्स, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) रोबोटिक्स लॅबोरेटरीचा उपक्रम देखील राबवणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये या विषयांबाबत रस निर्माण होईल. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी याची रचना करण्यात आली असून यासाठी अर्थसंकल्पात यासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय, पालिका आपल्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त पोषक खाणे देण्याच्या विचारात आहे. नर्सरी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही सोय असेल. यासाठी अर्थसंकल्पात 117.37 कोटींची तरतूद केली गेली आहे.