मुंबई : मुंबईत आपले स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न होते. म्हाडा, सिडकोमधील लॉटरीमुळे अशा लोकांची स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते. पण, नुकतेच सिडकोने काढलेली लॉटरी फसल्याचे समोर आले आहे. कारण, सिडकोकडे घरे घेण्यासाठी नव्हे तर लॉटरीमध्ये मिळालेली घरे परत करण्यासाठी झुंबड उडाल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीआधी काढलेल्या सोडतीमध्ये पसंतीचे घर न मिळालेल्या अर्जदारांना सिडकोने तळोजातील शिल्लक घरे घेण्याचा पर्याय दिला. पण हा निर्णय आता सिडकोलाचा अडचणीत टाकत आहे. अनेक ग्राहक सिडकोने घेतलेल्या निर्णयावर नाराज असून त्यांनी हा पर्याय नाकारला आहे. त्यामुळे आता अनेक अर्जदार सिडकोच्या कार्यालयामध्ये घरे परत करण्यासाठी गर्दी करत आहेत. (CIDCO Faces Backlash as Homebuyers Reject Unsold Flats)
हेही वाचा : IND VS PAK : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर देशविरोधी घोषणा, मालवणमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर काढलेल्या संगणकीय सोडतीत 1,881 अर्जदारांना पसंतीचे घर मिळाले नाही. त्यामुळे सिडकोने त्यांना तळोजातील घरे घेण्याचा पर्याय दिला होता. पण, अनेकांनी हा प्रस्ताव नाकारत घरे सरेंडर करण्याचा निर्णय घेतला. सिडकोने 8 दिवसांची मुदत दिली, पण ग्राहकांनी याआधीच नकार देण्यास सुरुवात केली. ग्राहकांच्या वाढत्या नाराजीमुळे सिडकोच्या प्रशासनासमोर ही घरे विक्रीस लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सिडकोच्या 26 हजार घरांसाठी 21,399 अर्जदारांनी अनामत शुल्क भरले होते. त्यापैकी 19,518 अर्जदारांना पसंतीचे घर मिळाले. पण, अद्याप 6,482 घरांची विक्रीच झालेली नाही. तसेच, कागदपत्रांच्या छाननीनंतर काही अर्जदार बाद होण्याची शक्यता असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिल्लक राहिलेल्या घरांची विक्री कशी करायची? हा मोठा प्रश्न सिडकोसमोर आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या घरांसाठी पुन्हा सोडत निघू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.