मुंबई : महाराष्ट्र सरकारचा महात्त्वाकांशी कोस्टल रोड अनेकदा चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्र सरकारकडून तब्बल 14 हजार कोटींचा खर्च करत बांधण्यात आलेल्या या रोडवर भेगा पडल्याचे आढळून आल्याने अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. तसेच, आता त्याच भेगांना झाकण्यासाठी पॅच लावल्यात आले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यावेळी बीएमसीला याबद्दल सवाल उपस्थित करण्यात आले. यानंतर आता महाराष्ट्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने घेतली आहे. मुख्य सचिवांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागितली आहे. (Coastal Road Mumbai 14000 crore cracks pmo ask detail to maharashtra government)
हेही वाचा : Thackeray vs Modi : मोदींचा हाच ‘सबका साथ सबका विकास’ असेल तर… उद्धव ठाकरेंचा निशाणा
मुंबईतील हाजी अली आणि वरळी दरम्यानच्या कोस्टल रोडवरील भेगा मुंबई महानगरपालिकेने डांबर टाकून भरल्या आहेत. कोस्टल रोडवरील पॅचचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने राज्याच्या मुख्य सचिवांकडून माहिती मागवली आहे. तसेच, राज्य सरकारनेही या संदर्भात पालिकेकडे विचारणा केली. त्यामुळे बीएमसीला या भेगांबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. “हाजी अली पुलाच्या उत्तरेकडील रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले होते. असे असले तरीही पुढील काही दिवसांत सांध्यावर काही भेगा पडल्या.” असे स्पष्टीकरण पालिकेने दिले. पावसाळ्यात भेगा पडू नयेत म्हणून मॅस्टिक डांबराचा वापर करून तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली. अतिरिक्त डांबरीकरणामुळे रस्ता अनेक ठिकाणी असमान झाला ज्यामुळे वाहनचालकांना त्रास झाला. या पॅचमुळे आवश्यकतेनुसार लेबल केले जाणार आणि आवश्यकतेनुसार नवीन डांबराचा थर लावला जाणार आहे. कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय सुनिश्चित करण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोस्टल रोडच्या गुणवत्तेवर याआधीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. सप्टेंबर 2024 मध्येही कोस्टल रोडला तडे गेल्याचे कळले होते. मार्च 2024 मध्ये कोस्टल रोडचा एक टप्पा सुरू करण्यात आला होता. पण अडीच महिन्यातच टनलमध्ये समुद्राचे पाणी येत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हे लिकेज रोखण्यासाठी विशेष अशा इपोक्सी केमिकलचा वापर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा कोस्टल रोडला तडे गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने खुला करण्यात आला. मरीन ड्राइव्ह ते वरळी या 10.58 किमी लांबीच्या कोस्टल रोडचे वर्णन राज्य सरकार आणि बीएमसीने मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी गेम चेंजर म्हणून केले आहे. पण ज्या पद्धतीने रस्त्यावरील भेगांचा मुद्दा समोर आला आहे, त्यामुळे बीएमसीला बरीच टीका सहन करावी लागत आहे.