Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईCongress : मतदार यादी घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक, प्रदेशाध्यक्ष सपकाळ जनतेमध्ये जाऊन करणार जनजागृती

Congress : मतदार यादी घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक, प्रदेशाध्यक्ष सपकाळ जनतेमध्ये जाऊन करणार जनजागृती

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे परंतु केंद्र सरकार व निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंवैधानिक सरकार स्थापन करण्यात आले होते, तर त्यानंतर विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे. मतदारयाद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य गुरदीप सप्पल, डेटा अनालिटिक्स विभाग व प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आणि सह प्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ व वाढवलेले मतदार यासंदर्भात राज्यातील 30 विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधींची बैठक टिळक भवन येथे झाली.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतदार याद्यातील घोटाळ्याची माहिती काँग्रेस शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला मागितली, ते देण्यास टाळाटाळ करत आहेत. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी केली, पण चोराच्या मनात चांदणे याप्रमाणे सरकार चौकशीपासून पळ काढत आहे. म्हणून हा मुद्दा आता जनतेच्या दरबारात घेऊन जाण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे, असे सपकाळ म्हणाले.

कॉपी पेस्ट माहिती देण्यास तीन महिने का लागतात ?

काँग्रेसचे केंद्रीय नेते गुरुदीप सप्पल म्हणाले की, मतदार संख्या वाढीसंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली, त्यांनी तीन महिन्यांची वेळ मागितली होती. आता पुन्हा तीन महिन्यांची वेळ न्यायालयाकडे मागितली आहे. सिस्टिम फुलप्रुफ आहे, एवढेच निवडणूक आयोग सांगते पण माहिती मात्र देत नाही, असा टोला त्यांनी निवडणूक आयोगाला लगावला. निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती आहे, केवळ कॉपी पेस्ट करून ती द्यायची आहे, त्यासाठी सहा महिन्यांचा वेळ का लागतो? असा सवाल सप्पल यांनी केला आहे.

महाविकास आघाडीला लोकसभा – विधानसभेत सारखीच मते, वाढीव 40 लाख कोणाचे?

काँग्रेसचे प्रविण चक्रवर्ती म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पाच महिन्याच्या काळात 40 लाख मतदार वाढले, ही संख्या मागील पाच वर्षांतील मतदारवाढीपेक्षा जास्त आहे. अनेक मतदारसंघात बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. विधानसभेला भाजपा युतीला लोकसभेपेक्षा 70 लाख मतदान जास्त झाले . तेवढेच मतदान भाजपा युतीला महाविकास आघाडीपेक्षा जास्त झाले. मविआची लोकसभा व विधानसभेतील मते मात्र सारखीच आहेत. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे, असा आरोप चक्रवर्ती यांनी केला.

कुंभमेळ्यात राहुल गांधी गेले नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते. त्यावर बोलताना सप्पल म्हणाले की, नरेंद्र मोदी हे 11 वर्षापासून पंतप्रधान आहेत, त्याआधी 12 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. या काळात झालेल्या कोणत्या कुंभमेळ्यात मोदी व शाह गेले होते, आणि सरसंघचालक मोहन भागवत प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात का गेले नाहीत. कुंभमेळ्यात गेले नाहीत तर मग त्यांच्या हिंदु असण्यावर प्रश्न का विचारला जात नाही, असा प्रतिप्रश्नही सप्पल यांनी केला.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे बेताल, विकृत वक्तव्य

एका प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर केलेले वक्तव्य अत्यंत बेताल, असंस्कृत व विकृत आहे. महिलेने प्रतिकार केला नाही असे विधान करून मंत्री गुन्हेगाराचे समर्थन करत आहेत का? असा संतप्त सवाल करून अशा मंत्र्यांचा राजीनामा घेण्यापेक्षा त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केले पहिजे, पण सरकारमध्ये नैतिकताच राहिलेली नाही असेही सपकाळ म्हणाले.

हेही वाचा : Uddhav Thackerya : कोकणातून पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का; रामदास कदम, योगेश कदम यांची नवी जुळवाजुळव