मुंबई – काँग्रेसचे पुणे जिल्ह्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसी विचारधारेला सोडून महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे) प्रवेश करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. आज सायंकाळी ते एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. त्यानंतर शिवसेना पक्ष प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावर बोलणे टाळले. रवींद्र धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, यासंबंधी विधिमंडळ परिसरात पत्रकारांनी नाना पटोलेंना विचारले असता त्यांनी नो कॉमेंट्स म्हणत धंगेकरानी काँग्रेस सोडण्यावर बोलणे टाळले.
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले होते. रवींद्र धंगेकरांच्या या विजयामुळे काँग्रेसला पुण्यात संजीवनी मिळाली असल्याची तेव्हा चर्चा होता. रवींद्र धंगेकरांसारखा रस्त्यावर उतरून लढणारा कार्यकर्ता पक्ष सोडून जात असताना काँग्रेसमधील वरिष्ठ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत नाही का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : Rohit Pawar : रवींद्र धंगेकरांनी तीन-चार वर्षांचा नाही तर 30-40 वर्षांचा विचार करावा; रोहित पवारांचे आवाहन
राज ठाकरेंच्या कुंभमेळ्यातील वक्तव्यावर म्हणाले…
राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या अस्वच्छतेबद्दल आणि कुंभमेळ्यातील स्नान आणि गंगाजल प्राशनाबद्दल केलेल्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले की, कुंभमेळा आणि गंगा स्नान हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे राज ठाकरे काय म्हणाले हे महत्त्वाचं नाही. आमच्यासमोर महाराष्ट्रातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे, त्याबद्दल नाना पटोले म्हणाले की, शेतकी स्वाभिमान योजनेते शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांची घोषणा झाली आहे. हे पैसे केव्हा मिळतात याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्राला लुटणारे सरकार
महायुती सरकारने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. पाच एंट्री पॉइंट्सवर मोठा टोल भ्रष्टाचार आहे. अनिल गायकवाड हे एमएसआरडीसीचे प्रमुख आहेत, त्यांनी या टोलला 2029 पर्यंत वाढवण्याची मुभा दिली आणि राज्यकडून हे पैसे देण्याबाबत प्रस्ताव आणला आहे. टोल कंपन्यांना 2 हजार कोटींचा फायदा करून देण्याचे काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्रावर आर्थिक संकट आले तर या माफियांना पैसे देण्याचे कारण काय आहे, असा सवाल नाना पटोलेंनी केला. हे सरकार साखर माफियांचे सरकार असल्याचा आरोप करत ते आम्ही समोर आणू असाही दावा नाना पटोलेंनी केला.
लाडक्या बहिणींना कोणतेही नियम नको
निवडणुकीपूर्वी जेवढ्या लाडक्या बहिणींनी अर्ज सादर केले, त्या सर्वांना योजनेचा लाभा देत राहिले पाहिजे. निवडणुकीपूर्वी त्यांनी नियमांचे पालन केले, आताच त्यांनी कसेकाय नियम भंग केला, असा सवाल करत नाना पटोले म्हणाले की, सगळ्या बहिणींना 2100 रुपये दिलेच पाहिजे, ही आमची भूमिका राहणार आहे.
हेही वाचा : Maharashtra Budget 2025 : निवडणुकीतील आश्वासनांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल, रोहित पवारांची अपेक्षा