Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईEknath Shinde : मानसन्मान मिळाला, पण विघ्नसंतोषी लोकांना पचले नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : मानसन्मान मिळाला, पण विघ्नसंतोषी लोकांना पचले नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

ठाणे : “अडीच वर्षांची कारकिर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकासाचे पर्व आहे. अडीच वर्ष दिवसरात्रं काम करुन सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले. या कामाची पोचपावती म्हणून राज्यभरातून लोक शिवसेनेत येत आहेत. आता कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही,” असे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले. शिवसेनेकडून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा अडीच वर्षांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा ‘एकनाथ पर्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडण्यात आला. (DCM Eknath Shinde attacked oppositions in thane event)

हेही वाचा : Congress : विधानसभेत मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख तर, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील 

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात एवढे मोठे पद मिळाले. मानसन्मान मिळाला पण काही विघ्नसंतोषी लोकांना हे पचले नाही. त्यांना ध्यानीमनी एकनाथ शिंदेची आठवण येते,” असे म्हणत त्यांनी शिवसेना उबाठा गटाला लगावला. “एकनाथ शिंदे चार भिंतीत रमणारा नाही, तर लोकांच्या सेवेत रमणारा आहे. कितीही टीका केली तरी यापुढे काम करत राहणार. कोविड होता तेव्हा काहीजण घरात हात धुवत बसले होते. आपण मात्र जीवाची पर्वा न करता पीपीई किट घालून रुग्णांना धीर देण्याचे काम केले. अडीच वर्षांतील कामाची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घेतली,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. “ठाण्यात आपण वाढलो. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात कार्यकर्ता म्हणून घडलो. आता ठाणे बदलत होते. अनेक मोठे प्रकल्प ठाण्यात साकारले जात आहेत. ठाण्याचे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम आहे,” अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करताना रक्ताचे पाणी केले. या काळात इर्शाळगडावरील बचाव कार्य, कोल्हापूरचा पूर, चिपळूणमधील पूर आणि बचाव कार्याच्या आठवणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढल्या. इर्शाळवाडीचे पुनर्वसन केले आणि तेथील नागरिकांना पक्की घरे दिली, असे ते म्हणाले. व्यासपीठावरील गर्दी आणि समोर बसलेले कार्यकर्ते हीच खरी आपली दौलत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी या उपक्रमातून आपण हे करुन दाखवले. राज्यातील 5 कोटी लोकांना फायदा झाला. दाखले, ड्रोन, ट्रॅक्टर, पॉवरटीलर, घराची चावी आपण लोकांना त्यांच्या दारी जाऊन सुपूर्द केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जे बोललो ते करुन दाखवले. अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात रोख रक्कम जमा केली. कोट्यवधी बहिणींचा लाडका भाऊ मिळालेली ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे. लाडकी बहिणी योजना कधीच बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना केलेले असंख्य फोन आणि कागदपत्रांवर केलेल्या स्वाक्षरीचां विचार केला तर आतापर्यंतचा नवा रेकॉर्ड ठरेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा : Samruddhi Expressway : महाकुंभमेळा काळात वाशीम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर 47 दिवसांत 65 अपघात 

महाविकास आघाडीच्या काळात राज्य पिछाडीवर होते. मात्र आपण उठाव केला आणि जनतेच्या मनातले सरकार आणले. मुख्यमंत्री म्हणून काम करताना अडीच वर्षात मागच्या अडीच वर्षांची कमतरता भरुन काढलीच शिवाय पुढील 10 वर्षांची पायाभरणी केली, अशी जनभावना आहे, असे ते म्हणाले. अडीच वर्षात शिवसेनेत राज्यभरातून विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रवेश करत आहेत. शिवसेनेची ताकद वाढत आहेत. शिवसेना आणखी मजबूत झाली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निगाहों मे मंजिल थी, गिरे और गिरकर संभलते रहे, हवाओं ने बहोत कोशिश की, मगर चिराग आंधीयों मे भी चलता रहा शेर बोलून दाखवला. ते पुढे म्हणाले की, आता कितीही संकटे आली तरीही एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही.