Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईDhananjay Munde : धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडेंविरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडेंविरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रात दोन गुंडे, कोकाटे आणि मुंडे, अशा घोषणा आज विधिमंडळ परिसरात विरोधकांकडून देण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. राजकीय पातळीवर मुंडे दिवसेंदिवस अडचणीत येत आहेत. तर दुसरीकडे कौटुंबिक वादातही मुंडे अडचणीत सापडले आहेत. त्यांची पहिली पत्नी करुणा मुंडे-शर्मा यांना दोन लाख रुपये दर महिना पोटगीचा आदेश काही दिवसांपूर्वी वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने दिला होता. या आदेशाला धनंजय मुंडे सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत.

कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे सत्र न्यायालयात 

गेल्या काही दिवसांपासून करुणा मुंडे-शर्मा या धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निर्णय देत धनंजय मुंडे यांच्याविरोधातील आरोप मान्य करत त्यांना पोटगी मान्य केली होती. करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगीचा आदेश कोर्टाने दिला होता. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या या आदेशाला मंत्री धनंजय मुंडे हे वरिष्ठ न्यायालायत आव्हान देणार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी येत्या 21 मार्च रोजी सुनावणी आहे. अधिवेशन काळातच या प्रकरणी सुनावणी होणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात आज विरोधकांनी विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी केली. महाराष्ट्रातील दोन गुंडे, कोकाटे आणि मुंडे अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे उत्तर दिले होते.

धनंजय मुंडे यांनी आज माध्यमांशी थोडक्यात संवाद साधला. मला बेल्स पाल्सी आजार झाला आहे, त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र धनंजय मुंडे हे उत्तम अभिनेते आहेत, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, मी 27 वर्षांपासून त्यांना ओळखते. त्यांनी नेता होण्यापेक्षा अभिनेता व्हायला पाहिजे होते.

धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट 

धनंजय मुंडे यांचा 3 मार्च रोजी राजीनामा होईल, अशी पोस्ट त्यांनी रविवारी केली होती. अजित पवारांनी त्यांना राजीनामा घेतला आहे, 3 मार्च रोजी त्यांचा राजीनामा मान्य केला जाईल, असे करुणा मुंडे यांनी एका माध्यमाशी बोलताना म्हटले होते. आता त्यांनी पुढील दोन दिवसांमध्ये मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल असे म्हटले आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधान परिषदेचे कामकाज आटोपल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यासोबतच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.  या भेटीमुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला का, अशी चर्चा सुरु झाली.

हेही वाचा : Election : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर, कोणाची लागणार वर्णी याकडे लक्ष