Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईDhananjay Munde : अजित पवारांचे वक्तव्य आणि धनंजय मुंडेंच्या ट्वीटमध्ये तफावत; राजीनामा नेमका कशामुळे

Dhananjay Munde : अजित पवारांचे वक्तव्य आणि धनंजय मुंडेंच्या ट्वीटमध्ये तफावत; राजीनामा नेमका कशामुळे

Subscribe

मुंबई – माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. तब्यतीच्या कारणामुळे मी राजीनामा दिला असल्याचे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला असल्याचे म्हटले आहे. पक्षाचे नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे या दोघांच्या वक्तव्यामध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमका राजीनामा नैतिकतेच्या आधारावर देण्यात आला की, तब्येतीच्या कारणामुळे असा वाद निर्माण झाला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अमानुष मारहाण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. अवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, असल्याचा आरोप आमदार सुरेश धस आणि आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी केली आहे. खंडणी प्रकरणातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंड यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी होत होती. अखेर आज (4 मार्च 2025) धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यानंतर समाज माध्यमात केलेल्या पोस्टमध्ये नैतिकतेचा उल्लेख कुठेही नसल्याचे समोर आले आहे.

काय आहे धनंजय मुंडेंचे ट्विट 

धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन राजीनाम्याची माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे.

माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.

Dhananjay Munde tweet
धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यानंतर समाज माध्यमात केलेल्या पोस्टमध्ये नैतिकतेचा उल्लेख कुठेही नसल्याचे समोर आले

 

जनतेच्या रोषामुळे मुंडेंचा राजीनामा 

धनंजय मुंडे यांच्या ट्विटमध्ये त्यांनी कुठेही मस्साजोगच्या घटनेची नैतिक जबाबदारी घेतलेली नाही. धनंजय मुंडे यांच्या या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे विरोधकांचा आरोप आहे. सरकारला त्यांचा राजीनामा घ्यायचाच नव्हता, मात्र काल संतोष देशमुख यांचे फोटो समोर आले आणि जनतेच्या रोषापुढे सरकारला नमते घेऊन राजीनामा घ्यावा लागला, असेही म्हटले जात आहे.

हेही वाचा : Fadnavis : दोन महिन्यांपासून फोटो मुख्यमंत्र्यांकडे, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे; ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याची माग