Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईDr. Virendra Kumar : बीएमसीच्या धर्तीवर देशभरात 'नमस्ते' योजना प्रभावीपणे राबवणार, वीरेंद्र कुमारांचे प्रतिपादन

Dr. Virendra Kumar : बीएमसीच्या धर्तीवर देशभरात ‘नमस्ते’ योजना प्रभावीपणे राबवणार, वीरेंद्र कुमारांचे प्रतिपादन

Subscribe

केंद्र शासनाच्या नॅशनल ॲक्शन फॉर मॅकेनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम (नमस्ते) योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेत कार्यरत 2 हजार 484 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याच धर्तीवर देशभरातील विविध महापालिकांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी व्यक्त केले आहे

मुंबई : केंद्र शासनाच्या नॅशनल ॲक्शन फॉर मॅकेनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम (नमस्ते) योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेत कार्यरत 2 हजार 484 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याच धर्तीवर देशभरातील विविध महापालिकांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी व्यक्त केले आहे. केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेअंतर्गत आज (20 फेब्रुवारी) मुंबई महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक उपकरणांचा संच (पीपीई किट) तसेच ‘आयुष्मान कार्ड’चे वितरण भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात गुरुवारी आयोजित सोहळ्यात करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. वीरेंद्र कुमार बोलत होते. (Dr. Virendra Kumar asserted that the Namaste scheme will be effectively implemented across the country on the lines of BMC)

केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले, स्वच्छता कर्मचारी स्वत:चे जीव धोक्यात घालून ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा प्रतिकूल परिस्थितींमध्ये स्वच्छतेचे कार्य करत असतात. त्यांनी हे काम केले नाही तर प्रत्येक कुटुंबीयांना त्यांचे घर, परिसर स्वच्छतेसाठी तसेच आरोग्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतील. मात्र, नागरिकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणूनच देशभरातील अशा स्वच्छता कर्मचाऱ्यांची तसेच सन्मानासाठी केंद्र शासनाच्या वतीने ‘नॅशनल ॲक्शन फॉर मॅकेनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम’ (नमस्ते) ही योजना राबविण्यात येत आहे. मलनि:स्सारण वाहिन्यांमध्ये उतरून मानवी पद्धतीने स्वच्छता करण्याऐवजी पूर्णत: यांत्रिक पद्धतीने स्वच्छतेचे काम केले जावे. तसेच, स्वच्छता करताना होणाऱ्या मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करुन नोंदणी करण्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. त्यांना सुरक्षाविषयक उपकरणांचा संच (पीपीई किट) तसेच ‘आयुष्मान कार्ड’चे वितरण केले जात आहे.

हेही वाचा – Maharashtra : जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावणाऱ्या मंत्र्यांना चाप, शासनाकडून परिपत्रक जारी

स्वच्छता कर्मचाऱ्यांची या योजनेत नोंदणी

आजवर देशभरातील 65 हजार 60 कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यापैकी 32 हजार 734 कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक उपकरणांचा संच आणि 15 हजार 153 कर्मचाऱ्यांना ‘आयुष्मान कार्ड’ वितरित करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या 2 हजार 484 स्वच्छता कर्मचाऱ्यांची या योजनेत नोंदणी करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबतीत केलेली कार्यवाही प्रशंसनीय असून याच धर्तीवर देशभरातील महापालिकांनीही कार्य करावे, अशी अपेक्षाही वीरेंद्र कुमार यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे सचिव अमित यादव यांनी ‘नमस्ते’ योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.

लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्राचे वाटप

या कार्यक्रमात स्वच्छता उद्योजकता योजनेअंतर्गत यांत्रिक स्वच्छता वाहनांच्या खरेदीसाठी अनुदानासह कमी दराने कर्जास पात्र लाभार्थ्यांना तसेच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने स्वच्छताविषयक उपकरणांच्या खरेदीसाठी कर्जास पात्र लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्राचे वाटपही डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हत्ये करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे सचिव अमित यादव, वरिष्ठ आर्थिक सल्लागार योगिता स्वरुप, राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आर्थिक व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात कुमार सिंग, महाराष्ट्राच्या सामाजिक व न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लहुराज माळी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

हेही वाचा – Manikrao Kokate : राजकीय वैरातून 30 वर्षांपूर्वी केस, माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात मागणार दाद


Edited By Rohit Patil