HomeमहामुंबईShivaji Park : खोदकाम करू नका त्यापेक्षा गवताची लागवड करा, प्रदूषण मंडळाचे...

Shivaji Park : खोदकाम करू नका त्यापेक्षा गवताची लागवड करा, प्रदूषण मंडळाचे पालिकेला आदेश

Subscribe

शिवाजी पार्कवरील धूळ तसेच वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ठोस पावले उचलली आहेत. मैदानातील खोदकाम थांबवण्याचे आदेश देतानाच या मैदानात यापुढे कोणत्याही प्रकारे खोदकाम केले जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेला दिले आहेत.

Air Pollution at Shivaji Park : मुंबई : शिवाजी पार्कवरील धूळ, त्यामुळे होणारे प्रदूषण हा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजतो आहे. तेथील रहिवाशांनी देखील या विरोधात आवाज उठवला होता. आता लवकरच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवरील धूळ तसेच वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ठोस पावले उचलली आहेत. मैदानातील खोदकाम थांबवण्याचे आदेश देतानाच या मैदानात यापुढे कोणत्याही प्रकारे खोदकाम केले जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेला दिले आहेत. तसेच, येथील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने मैदानात तात्काळ गवत लागवड करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. (dust air pollution at Shivaji Park among slew of steps, mpcb directs bmc to disallow digging plant grass)

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे प्रदूषण होत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी महापालिकेकडे केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्क येथील मैदानाला भेट दिली होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रदूषण मंडळाने पालिका अधिकाऱ्यांना या प्रदूषणावरील ठोस उपाय सांगण्यासाठी 15 दिवसांची डेडलाइन दिली होती.

हेही वाचा – Nitin Gadkari : केंद्र सरकार म्हणते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पण नितीन गडकरी म्हणतात…

यापूर्वी शिवाजी पार्कवर सध्या असलेला मातीचा पहिला थर काढून टाकण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच, शिवाजी पार्कवरील ही माती अधिकाधिक पोषक करण्याची सूचना पालिकेला करण्यात आली आहे. ज्यायोगे यावर चांगल्याप्रकारे गवत उगवेल आणि येथील धूळ उडण्याचा त्रास कमी होईल, असे MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले.

मैदानात वाफे करून तेथे गवत उगवण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला सांगितले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी ही गवताची लागवड पूर्ण व्हायला हवी, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

मैदानाची देखभाल वर्षभर व्हावी

वर्षभर या मैदानाची व्यवस्थित देखभाल व्हावी यासाठी ठेकेदार नेमण्याच्या सूचना देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला केल्या आहेत. या मैदानातील खोदकाम पूर्णपणे थांबवण्याच्या सूचना देखील पालिकेला देण्यात आल्या आहेत. जर मैदानात काही सभा, कार्यक्रम असतील तर त्याची तयारी ही खोदकामाशिवाय व्हायला हवी, असेही मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी म्हटले आहे.

याबाबत ठोस उपाय करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला 15 दिवसांची मुदत दिली होती. यानंतर तज्ज्ञांच्या एका पथकाने मैदानाला भेट देत प्रदूषण नियंत्रण मंडळासोबतच पालिकेलाही काय उपाय करता येतील, यासंदर्भात आपला अहवाल दिला.

हेही वाचा – Mumbai Tourism : राणीच्या बागेत येणार जिराफ अन् झेब्रा, लंडनच्या धर्तीवर उभारणार मुंबई आय

पालिकेने अशा मार्गदर्शक सूचना मिळाल्याचे सांगितले आहे. यादृष्टीने लवकरच निविदा देखील काढली जाईल. या गवत उगवण्याच्या कामाला वेग देतानाच मैदानातील खोदकामाला विरोध करण्यासाठी नोटीस बजावली जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी पार्कला मोठाच इतिहास आहे. 28 एकरावरील हे खुले मैदान आहे. खेळाडू, तसेच मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी नागरिकांची यालाच पसंती असते. तसेच पर्यटक देखील येथे भेट देताना दिसतात. याशिवाय, शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने अनेक राजकीय पक्ष आपल्या सभांसाठी याच मैदानाला प्राधान्य देतात.