मुंबई : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये आज मंगळवारी (ता. 11 फेब्रुवारी) बैठक झाली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीतून बाहेर आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी कशाबाबत चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी मुंबईचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी डीपीडीसीची बैठक घेतली होती. या बैठकीत मुंबईतील आमदारांनी विविध प्रश्न मांडले होते. याच प्रश्नांशी संबंधित चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती, अशी माहिती एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली. मुंबईतीली विषयांव्यतिरिक्त सुद्धा विविध विषयांवर चर्चा झाल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde and Ajit Pawar held meeting between two Deputy CM regarding Mumbai issues)
मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्हा दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. इथे जगभरातील लोक येतात. त्यामुळे इथे विशेष लक्ष आहे. मुंबईची ज्यावेळी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. त्यावेळी सर्वच आमदारांनी काही सूचना केलेल्या होत्या. त्या सूचनांप्रमाणे मुंबईतील रुग्णालये, उद्याने, रस्ते, त्याचबरोबर काही नवीन प्रकल्प आहेत. मुंबईतील कोळीवाडे आहेत, कोळीवाड्यांचा पुनर्विकास आहे, त्याचबरोबर मुंबईतील किल्ल्यांचा पुनर्विकास आहे, रुग्णालयांमध्ये काही गोष्टींची आवश्यकता आहे, तिथल्या सुविधांचा प्रश्न आहे, या सर्वच गोष्टींवर डीपीडीसीच्या बैठकीत चर्चा झाल्या होत्या आणि त्याचबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्यासोबत चर्चा झाली, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये मुंबई शहराला आवश्यक तो निधी ठेवण्याची मागणी केली असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, ठाणे सुद्धा एक मोठा जिल्हा आहे. 18 आमदार, तीन-चार विधान परिषदेचे आमदार, खासदार आणि एकंदरित पालघरचे विभाजन होण्याआधी सुद्धा हा मोठा जिल्हा होता. या भागात सुद्धा अनेक प्रकल्प आहे. आरोग्य आणि शैक्षणिक विभागाशी संबंधित सुविधा आहेत, त्याचा आणखी विकास झाला पाहिजे. तर, काही पर्यटन स्थळ आहेत, त्याचा देखील विकास झाला पाहिजे, या सर्वाबाबत चर्चा झाली असून यासाठी जे पैसे आवश्यक आहेत, त्याची सुद्धा मागणी केली आहे. त्यामुळे विकासासाठी कुठेही पैसे कमी पडणार नाही, असेही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.