Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईEknath Shinde : खरच महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलती बंद होणार? उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

Eknath Shinde : खरच महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलती बंद होणार? उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

Subscribe

मुंबई : काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. यावेळी लोकसभेत झालेल्या पराभवानंतरही महायुतीने मोठा विजय मिळवला. फक्त भाजपच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही मोठ्या प्रमाणात विजय मिळाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या योजना तसेच अनेक निर्णय त्यांच्यासाठी निवडणुकीत संजीवनी ठरले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट देण्यात आली होती. पण नुकतेच एका कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही सवलत रद्द करणार असल्याचे भाष्य केले. पण यावर आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Eknath Shinde DCM on pratap sarnaik on st women 50 percent discount in st corporation bus)

हेही वाचा : Politics : मुंडे-कोकाटेंमुळे महायुती अडचणीत, अधिवेशनापूर्वीच मविआला मिळाले आयते कोलीत 

पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहि‍णींना देण्यात आलेली 50 टक्के सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले होते की, “महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे. एसटीने महिलांना अर्ध्या दराने प्रवासाची सुविधा दिली आहे. ज्येष्ठांना मोफत, विविध पास आणि अन्य सुविधांमुळे एसटी रोज तीन कोटींनी तोट्यात आहे.” असे विधान केल्यानंतर ही सवलत रद्द होणार अशी चर्चा सुरू होती.

विरोधकांवर टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा आपण एक सामान्य कार्यकर्ता आहोत. मात्र काही जणांनी मला हलक्यात घेतले. त्यामुळे 2022 मध्ये त्यांचा टांगा पलटी केला. राज्यात डबल इंजिनचे सरकार आणले. विधानसभेतील भाषणात मी 200 हून अधिक जागा निवडून आणू, अशी घोषणा केली होती. निवडणुकीत आम्ही महायुतीच्या २३२ जागा निवडून आणल्या. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, हा इशारा ज्यांना समजायचा आहे ते समजले आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, साधुसंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांचे योगदान होते,” असे ते म्हणाले. ईमेलद्वारे मिळालेल्या धमकी संदर्भात विचारले असता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, धमक्यांना मी कधी घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. दहावीच्या पेपरसंदर्भात चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कॅबिनेट बैठकीत कॉपीमुक्त महाराष्ट्राचा संकल्प सरकारने केला आहे. त्यानुसार आजच्या पेपरफुटीतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.