Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईGhatkopar : घाटकोपरचे माजी नगरसेवक सुरेश गोलतकर यांचे निधन

Ghatkopar : घाटकोपरचे माजी नगरसेवक सुरेश गोलतकर यांचे निधन

Subscribe

मुंबई : घाटकोपर (पूर्व) पंतनगर येथील माजी नगरसेवक सुरेश गोलतकर (74) यांचे मंगळवारी (4 मार्च) दुपारी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर राजावाडी स्मशानभूमी येथे मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, भाजपचे माजी आमदार प्रकाश मेहता, भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा, शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रदीप सावंत (उबाठा) शिवसेनेचे उप विभाग प्रमुख चंद्रकांत चंदेलिया, शिवसेना, भाजप, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (Ghatkopar Former corporator Suresh Golatkar passed away)

हेही वाचा : Mumbai : मुंबईतील बचत गटातील महिला करणार खाद्यपदार्थांचे वितरण, काय आहे प्रोजेक्ट आर्या? 

दिवंगत सुरेश शांताराम गोलतकर हे मूळचे शिवसैनिक होते. ते दोन वेळा शिवसेनेतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनतर शिवसेनेत असताना ते काही वरिष्ठांच्या बोलण्याने दुखावले गेले. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये नारायण राणे समर्थक म्हणून प्रवेश घेतला होता. त्यानंतर तिसऱ्यांदा ते काँग्रेसकडून निवडणूक लढवून निवडून आले होते. साधारणतः एका वर्षांपूर्वी ते चक्कर आल्याने खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना स्मृतिभ्रंश आजार जडला. त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

पण, काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. त्यानंतर ते वर्षभर घरीच आजारी अवस्थेत उपचार घेत होते. मंगळवारी ४ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे गोलतकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सुरेश गोलतकर हे उत्तम रांगोळीकार आणि चित्रकार होते. त्यांनी ‘ एन ‘ प्रभाग समितीचे अध्यक्ष भूषविले होते. तसेच, विविध समित्यांचे सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली होती.


Edited by Abhijeet Jadhav