Friday, March 21, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईJitendra Awahd : केम छो प्रविण भाई दरेकर... सारो छे..., ढोकला-फाफडा मुंबईकरांचे मुख्य अन्न; आव्हाडांचा टोला

Jitendra Awahd : केम छो प्रविण भाई दरेकर… सारो छे…, ढोकला-फाफडा मुंबईकरांचे मुख्य अन्न; आव्हाडांचा टोला

Subscribe

मुंबई – केम छो प्रविण भाई… केम छो प्रविण भाई दरेकर.. सारो छे… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज विधिमंडळ परिसरात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रविण दरेकर यांचे स्वागत आणि विचारपूस केली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य आणि माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे वक्तव्य केले. त्यावरुन विरोधक आज आक्रमक झाले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आता गुजराती बोलायचं. ढोकला, फाफडा, जिलबी हेच खायचं. वडा, वडापाव मुंबईत मागायचं नाही, असा उपरोधिक टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी, ‘मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे. मुंबईत शहरात विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे, असे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य केले. त्याचे पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडलेले पाहायला मिळाले.

राष्ट्रावादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आता फक्त गुजरातीमध्ये बोलायचं. मुंबईत ढोकला, फाफडा आणि जिलबीच खायची. वडा, वडापाव हे आता विसरा. मुलांनाही गुजराती शाळेत टाकायचे. गुजरातमध्येच बोलायचे. कारण आज घाटकोपरची भाषा गुजराती झाली आहे. उद्या मुलूंडची भाषा गुजराती होईल, अंधेरीची भाषा गुजराती होईल. दादर तेवढं मराठी बोलणाऱ्यांच उरेल. आम्ही फक्त दादर पुरते मर्यादीत राहू. थँक्यू भय्याजी जोशी!’

बीडचा बिहार अन् महाराष्ट्राचा गुजरात करण्याचे धोरण

भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर विरोधक संतप्त झाले आहेत. आव्हाडांनी विधिमंडळ परिसरात व्यंगात्मक गुजराती भाष्य करुन सत्ताधाऱ्यांना डिवचले. त्यासोबतच महाराष्ट्राचा गुजरात करण्याचे धोरण महायुती सरकार आणत असल्याचा आरोप समाज माध्यमातील पोस्टमधून केला आहे.

धारीवीमधील एक गुजराती पोस्टर ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे की, पहा आणि शांत रहा….!
आधीच सत्तर टक्के टेंडर गुजराती लोकांच्या घश्यात घातले आहेतच. आता कामासाठी माणसे सुद्धा गुजरातीच हवीत. बीडचा बिहार होतोय, हे बोलण्याआधी महाराष्ट्राचा गुजरात करायचं धोरण पूर्णपणे अंमलात आणताना माननीय सरकार…!!!
महाराष्ट्र द्रोह

हेही वाचा : Bhaskar Jadhav : भय्याजी जोशींचे वक्तव्य मुंबई हस्तगत करुन महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : Bhaiyyaji Joshi : घाटकोपरची भाषा गुजराती; वादग्रस्त वक्तव्यानंतर भय्याजी जोशींचे स्पष्टीकरण, म्हणाले…