मुंबई : कुर्ला स.गो.बर्वे मार्ग येथे 9 डिसेंबर 2024 रोजी बेस्ट उपक्रमातील भाडे तत्वावरील एका बस चालकाकडून निष्काळजीपणामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला होता. या अपघातात 9 निष्पाप जीवांचा बळी गेला होता. तर 40 जण जखमी झाले होते. त्या 9 मृतांपैकी 3 मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रमातर्फे बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहणारे सनदी अधिकारी श्रीनिवास (धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य अधिकारी) यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश दिला आहे. (Kurla BEST Bus Accident two lakhs to the relatives of those who died)
कुर्ला बेस्ट बस अपघात 9 डिसेंबर रोजी झालेला असताना अडीच महिन्यांनी बेस्ट उपक्रमाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. या आर्थिक मदतीमुळे एकीकडे सदर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना थोडाफार आर्थिक दिलासा मिळालेला आहे. या घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची, त्यांच्या वारसदारांची रीतसर कायदेशीर माहिती बेस्टच्या विधी खात्याने घेतली आणि त्याची खातरजमा केल्यानंतरच सदर आर्थिक मदत देण्यात आली. त्यामुळेच सदर मदत देण्यास थोडा उशीर झाल्याचे बेस्टच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा… BEST Employees : कंत्राटी कामगारांचा मोर्चा आणि लाक्षणिक संप; प्रवाशांचे हाल
कुर्ला स.गो.बर्वे मार्ग येथे 9 डिसेंबर 2024 रोजी रात्रीच्या सुमारास बेस्ट उपक्रमातील भाडे तत्वावरील एका बसच्या चालकाने सुसाट बस पळवत नेत 40 वाहनांना आणि पादचारी यांना जोरात धडक दिली होती. या भीषण दुर्घटनेत 49 जण जखमी झाले होते. त्यापैकी 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले होते. जखमींवर विविध रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले. मात्र या अपघाताला जबाबदार बेस्ट उपक्रमातील भाडे तत्वावरील बसचा चालक जबाबदार होता. बेस्ट उपक्रमाने सुद्धा बसगाडीमध्ये काही दोष नव्हता, असे स्पष्ट केले आहे.
सदर अपघातात मृत पावलेल्या 9 व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येणार आहे. त्यानुसार, सदर 9 मृत व्यक्तींपैकी आफरीन अब्दुल सलीम शाह (वय वर्ष 19), मो.इस्लाम मो.निजाम अन्सारी (वय वर्ष 49), मेहताब शेख (वय वर्ष 22) या तीन मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना आज बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहणारे सनदी अधिकारी श्रीनिवास यांच्या हस्ते प्रत्येकी 2 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.