मुंबई – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन शिवाजी पार्क येथे करण्यात आले आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे, यानिमित्ताने मनसेच्यावतीने मान्यवरांचे काव्यवाचनाला आगळावेगळा सोहळा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला. काव्यवाचनाची सुरुवात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. यावळी राज ठाकरेंनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘महाराज’ या ग्रंथातील छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेली कविता सादर केली.
मनसेच्या काव्यवाचन कार्यक्रमासाठी हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले, हिंदी चित्रपट पटकथा लेखक आणि शायर जावेद अख्तर, मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता अशोक सराफ, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, छावा चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेला अभिनेता विकी कौशल, अभिनेता रितेश देशमुख हे देखील कविता सादर करणार आहेत.
राज ठाकरेंनी सादर केलेली कविता जशीच्या तशी
कोण तूं रे कोण तूं
कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ?
जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ?
खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ?
वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ?
भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ?
मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ?
अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ?
कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ?
वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ?
शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ?
की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ?
शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ?
की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ?
कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ?
चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ?
तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ?
मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ?
द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ?
गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं !
संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं !
कोण तूं रे कोण तूं…….कोण तूं रे कोण तूं