जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. याआधी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी ते भाजपात जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, भाजपातील काही नेत्यांमुळे त्यांचा प्रवेश रखडल्याचे सांगण्यात येत होते. पण आता पुन्हा ते भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतरच या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पण या भेटीवरून मुक्ताईनगर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र डागले आहे. “खडसे हे सत्ता पिपासू असून जिकडे सत्ता तिकडे ते” असा टोला पाटलांनी लगावला आहे. (Maharashtra Politics Eknath Khadse met Devendra Fadnavis and criticized Chandrakant Patil)
आमदार एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, एकनाथ खडसे हे सत्ता पिपासू आहेत, जिकडे सत्ता तिकडे ते जाण्याचा प्रयत्न करत असतात. मागील काळात महाविकास आघाडी सरकार आले, ज्यानंतर ते लगेच तिकडे गेले. नंतर भाजपाचे सरकार आले तर ते भाजपामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेतून मालमत्ता मिळवत आपले दुकान चालू ठेवण्याचा यांचा प्रयत्न असतो. खडसे केवळ सत्तेसाठी नाही तर त्यांच्या मागील ईडी सारख्या कारवाया कशा थांबतील, यासाठी भेट घेत असावेत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
हेही वाचा… Maharashtra Politics : मुख्यमंत्री फडणवीस बीडमध्ये, मंत्री मुंडे मुंबईमध्ये; पोस्ट करत सांगितले कारण
तर आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. मी मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. माझ्या मतदारसंघात सहकारी तत्वावर सूत गिरणी, मंदिर, इंजिनिअरींग कॉलेज असे काही विषय आहेत. मी त्यांना पत्र दिलं. पण राजकीय विषयांवर कुठली चर्चा झाली नाही. भाजपामध्ये जाणे किंवा भाजपामध्ये प्रवेश करणे किंवा कुठलीही राजकीय चर्चा फडणवीस यांच्यासोबत झालेली नाही. तर मी सध्या भाजपात जाण्याचा कोणताही विचार करत नसल्याचे खडसेंकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, आता आमदार चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर खडसे काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.