Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईSwargate Case वडेट्टीवारांचे योगेश कदमांना खडे बोल, थोडी लाज शरम बाळगा; अंधारे म्हणाल्या, लवकर बरे व्हा; असं काय...

Swargate Case वडेट्टीवारांचे योगेश कदमांना खडे बोल, थोडी लाज शरम बाळगा; अंधारे म्हणाल्या, लवकर बरे व्हा; असं काय म्हणाले गृहराज्यमंत्री

Subscribe

मुंबई – ‘परवा स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही. ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कोणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील’ असं खळबळजनक वक्तव्य राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वारगेट बसस्थानकातील घटनेने संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपी दत्तात्रय गाडेला फासावर लटकवण्याचे आश्वासन दिले आहे. तर त्यांच्याच पक्षाचे गृहराज्य मंत्री पीडितेकडून विरोध झाला नाही, आरोपी पकडल्यानंतर बऱ्याच गोष्टी उघड होतील असे म्हणत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

थोडी लाज शरम बाळगली पाहिजे

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पुणे- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय ? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का ? स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत? स्वारगेट मध्ये बलात्कार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही, म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहे. विधान करताना मंत्र्यांनी थोडी लाज शरम बाळगली पाहिजे!’ असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

माजी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले, ‘आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचं आहे? आरोपीला क्लिनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? राज्यातील महिलांना लाडक्या बहीण म्हणून मिरवणाऱ्या युती सरकारची नियत इतकी खालच्या स्तरावरची असताना महिलाना सुरक्षित कसे वाटेल? आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे माहिती होताच महायुती मंत्रिमंडळाकडून आता बलात्कारी आरोपीची बाजू घेऊन त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे का?’ असा घणाघात काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी योगेश कदम यांना ‘लवकर बरे व्हा’ असा सल्ला दिला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या बलात्काराची घटना घडल्यानंतर गृहराज्य मंत्री पीडितेने प्रतिकार केला नसल्याचे म्हणत आहेत. त्यांनी लवकर बरे व्हावे, असे अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा : Swargate rape Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे आंदोलन; पालकमंत्री सिडको बसस्थानकात, पोलीस चौकी रिकामी