HomeमहामुंबईMAITRI 2.0 : उद्योग विभागाच्या मैत्री 2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण

MAITRI 2.0 : उद्योग विभागाच्या मैत्री 2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण

Subscribe

– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : राज्य सरकारच्या उद्योगस्नेही ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरवण्यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत मैत्री 2.0 अर्थात maitri.maharashtra.gov.in या पोर्टलचे अनावरण मंगळवारी (4 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मैत्री पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या मैत्री 1.0 पोर्टलचे आता 2.0 व्हर्जन आणण्यात आले आहे.(MAITRI 2 0 portal of the industries unveiled in Maharashtra Cabinet Meeting)

हेही वाचा : Damania VS Munde : धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांचा वाद आता न्यायालयात 

maitri.maharashtra.gov.in यामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा आणि तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सादरीकरणावेळी सांगितले. या पोर्टलमुळे महाराष्ट्रातील उद्योग सुलभीकरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढणार आहे. तसेच, उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकदारांना अधिक सोपी आणि जलद सेवा मिळणार आहे. एकाच अर्ज प्रणालीमुळे उद्योगांना विकसनाच्या विविध टप्प्यांवर परवाने, ना हरकत इत्यादींच्या आवश्यकता असते. मैत्री पोर्टलमार्फत विविध परवाने, ना हरकत इत्यादी उपलब्ध असल्याने उद्योगांना शासकीय विभागांकडे स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. रिअल-टाईम ट्रॅकिंग आणि डॅशबोर्डमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आधारित चॅटबॉट आणि ऑनलाईन साहाय्य केंद्रामार्फत गुंतवणूकदार आणि उद्योजकांना विविध योजना, परवाने, सबसिडी इत्यादी बाबतची विविध माहिती तत्परतेने उपलब्ध होण्यासाठी मैत्री पोर्टलवर उद्योग मित्र चॅटबॉट सुविधा उपलब्ध करण्यात आली. इन्सेन्टिव्ह कॅल्क्युलेटरमुळे सरकारी योजनांतर्गत मिळणार्‍या प्रोत्साहनपर लाभांचे अंदाजपत्रक समजणार आहे. डिजिटल डॉक्युमेंट डिपॉझिटरीमुळे उद्योगाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची सुरक्षित साठवणूक आणि सहज उपलब्धता होणार आहे.

विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी

पोर्टलमध्ये 15 विविध विभागांच्या 119 सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधील 100 सेवा संपूर्णपणे एकत्रित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, बॉयलर्स, नगर विकास, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या सेवांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राला अत्याधुनिक ऑनलाईन सुविधांचा लाभ मिळणार आहे.


Edited by Abhijeet Jadhav