मुंबई : कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन आणि पंधरवडा’ आयोजित करण्यात येतो. यंदा देखील 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे दुपारी 3 वाजता महापालिका सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी असणार आहेत. (Marathi language fortnight begins in Mumbai Municipal Corporation from February 27)
मुंबई महापालिकेने केलेल्या ठरावानुसार थोर साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सन 2010 पासून ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षी 27 फेब्रुवारी ते 13 मार्चपर्यंत महापालिकेमार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येतात. महापालिकेच्या सर्व खात्यातील कामकाजाची भाषा मराठी असण्यासह मराठी भाषेचा 100 टक्के वापर व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. तसेच दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 27 फेब्रुवारी रोजी मराठी साहित्यातील अभ्यासक, विचारवंत, ज्येष्ठ लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, कादंबरीकार आदींचे महापालिकेकडून व्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता मुंबई महापालिका मुख्यालयातील मुख्य सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हेही वाचा – BMC Recruitment Results : मुंबई मनपाच्या कार्यकारी सहायक पदांचा निकाल जाहीर
‘एकपात्री अभिनय’स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव
मराठी भाषेचा प्रसार अणि प्रचार व्हावा यासाठी महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्यावतीने दरवर्षी भित्तिपत्रके प्रकाशित केली जातात. ही भित्तिपत्रके महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये प्रदर्शित केली जातात. मुंबई महापालिकेच्यावतीने ‘एकपात्री अभिनय’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव देखील 27 फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यात करण्यात येणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या मराठी शब्दकोशाचे प्रकाशन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजात नित्याने वापरात असलेले मराठी शब्द या शब्दकोशात घेण्यात आले आहेत.
मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यास दिग्गजांची उपस्थिती
महापालिकेने सन 2010 मध्ये आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात कवी प्रवीण दवणे, विजया वाड, सन 2011 मध्ये कवी अशोक नायगावकर, सन 2012 मध्ये साहित्यिक व माजी कुलगुरू डॉ. यू. म. पठाण, सन 2013 मध्ये लेखक अरुण साधू, सन 2014 मध्ये कवयित्री नीरजा, सन 2015 मध्ये संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. यशवंत पाठक, सन 2016 मध्ये लेखक शिरीष कणेकर, सन 2017 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गंगाराम गवाणकर, सन 2018 मध्ये अभिनेता प्रशांत दामले, सन 2019 मध्ये समीक्षक द्वारकानाथ संझगिरी, सन 2020 मध्ये कवी किशोर कदम उर्फ सौमित्र, सन 2022 मध्ये दिग्दर्शक जब्बार पटेल, सन 2023 मध्ये ज्येष्ठ साहित्य समंलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे, सन 2024 मध्ये साहित्य समंलनाचे तत्कालीन अध्यक्ष रवींद्र शोभणे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे.
हेही वाचा – DA Hike : राज्य सरकारी कर्मचार्यांना होळीची भेट, महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ