मुंबई : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रविवार, 9 मार्च रोजी रेल्वेच्या पश्चिम, मध्य व हार्बर अशा तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मुंबई विभागातील उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. (Mega Block On Central Harbour And Western Railway Line On Sunday)
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावरील अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.47 पर्यंत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी – वाशी / बेलापूर / पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, सीएसएमटी – वांद्रे / गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते भाईंदर मार्गावरील अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील हा ब्लॉक शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 4.45 पर्यंत असेल. या ब्लॉकच्या कालावधीत विरार – भाईंदर / बोरिवलीदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा – Pune Crime : भरचौकात BMW थांबवली, पॅन्ट काढली अन्…; पुण्यात मद्यधुंद तरूणाचे अश्लील चाळे