मुंबई – मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे. मुंबईत शहरात विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे, असे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरविरोधकांकडून जोरदार हल्लाबोल होत आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला आहे.
भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि आमदरांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले आहे. त्यानंतर विधिमंडळ परिसरात माध्यामांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, भाजप, संघ आणि त्यांच्या सहयोगी संघटनांचे लोक जेव्हा काही बोलतात, विधान करतात तेव्हा त्यामागे निश्चित काही तरी विचार असतो. भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यामागे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा विचार आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव
आमदार भास्कर जाधव म्हणाले, निवडणुकीच्या वेळी त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला. त्यावेळी त्यांना निवडणुक लढणे, हा केवळ एकच उद्देश होता. आम्ही आताच ज्या लोकांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले त्यांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले आहे, असे सांगत भास्कर जाधव म्हणाले,
मुंबई ही आमची आई आहे. आई सगळ्या मुलांची काळजी घेते, तशी ती मुंबईने सगळ्यांची काळजी घेतली. सत्तेसाठी या आईपासून सगळ्यांना वेगवेगळे करणे, याचा अर्थ यांना मुंबई महापालिका हस्तगत करून तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.
मुंबईला एक ठेवण्यासाठी आणि मुंबईला वाचवण्यासाठी ठाकरे कुटुंबियांनी काय-काय केले, हे सगळ्यांनी बघितले आहे. मुंबई वाचविण्यासाठी सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिमागे उभे राहा, असे आवाहनही आमदार जाधव यांनी केले आहे.
संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी हे मुंबईतील विद्यानगर येथील कार्यक्रमात काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला माहित नसल्याचे सभागृहामध्ये म्हटले आहे, त्यावरही भास्कर जाधव यांनी टीका केली. ते म्हणाले की,
राज्याच्या मुख्यमंत्री यांना इतक्या संवेदनशील विषयाबद्दल माहिती नसावी, याचे मला आश्चर्य वाटते. ते म्हणाले की मी ते वक्तव्य ऐकले नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.