मुंबई : नुकतेच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 2025-26 हा मंगळवारी (4 फेब्रुवारी) सादर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “कोणतीही करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला मुंबई महापालिकेचा तब्बल 74 हजार 427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. उज्ज्वल भविष्यासाठी मुंबई वेगाने कात टाकत आहेत. ग्लोबल मुंबईची चाहूल देणाऱ्या अर्थसंकल्पासाठी मी मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्ति आयुक्त अभिजित बांगर यांचं अभिनंदन करतो.” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. (Mumbai BMC Budget DCM Eknath Shinde reaction)
हेही वाचा : BMC Budget 2025 : बीएमसीचा मुंबईकरांना दिलासा, अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
“सकारात्मक, विकासाभिमुख, विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत आणि गरीब कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व वर्गांच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधांचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आधुनिक मुंबईचा शुभारंभ ठरेल. मुंबई महापालिकेचा 74 हजार 427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर झाला. मुंबई वेगाने कात टाकत आहे. विकसित होत आहे. आम्ही दोन टप्प्यात मुंबईच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केले.” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, अर्थसंकल्पात 43 हजार कोटी विकासकामांवर खर्च होणार आहेत. त्यावरून मुंबईचा विकास राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने किती गांभीर्याने घेतला आहे, हे दिसून येते. भांडवली खर्चातली ही वाढ विक्रमी असून येत्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात 7 हजार कोटींनी भर पडली आहे, याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
“बेस्टसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देतानाच इथला प्रवास वेगवान करण्यावरही भर देण्यात आलेला आहे. प्रदुषणमुक्त, खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई हा दिलेला शब्द खरा करून दाखवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात ग्लोबल मुंबई ही देशाचे फिनटेक कॅपिटल म्हणून आकाराला येत आहे. जगाच्या नकाशावर मुंबई दिमाखाने तळपताना दिसेल, त्याचाच हा शुभारंभ आहे.” असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.