मुंबई : कामाची वेळ संपलेली नसताना घरी जाण्यासाठी हातातील काम बाजूला ठेवत बराच वेळ अगोदर हजेरीसाठी फेशियल बायोमेट्रिक मशीन समोर अनेक जण रांग लावल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने आपल्या कर्मचार्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेत काही वर्षापूर्वी हजेरी बुकावर कर्मचार्यांची स्वाक्षरी घेऊन हजेरी लावण्याची पद्धत होती. त्याचा काही काम कर्मचारी दुसर्याकरवी अथवा मुकादम, वरिष्ठांना सांगून आपली बनवट स्वाक्षरी करून हजेरी लावत असत. त्यामुळे अनेक कर्मचारी कामावर बिनधास्त दांड्या मारत आणि बाहेर कुठेही मजा करत असत. त्यामुळे काम न करता हजेरी लागत असल्याने दरमहा त्यांना पूर्ण पगार मिळत असे. (Mumbai BMC Facial Biometric recognition notice)
हेही वाचा : Chandrakant Patil : सहायक प्राध्यापकांच्या 4, 435 पदांची लवकरच भरती, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती
ही गंभीर बाब लक्षात आल्याने मुंबई महापालिकेत 2018 पासून मस्टरवरील हजेरी पद्धत बंद करून हाताच्या बोटांच्या ठशाद्वारे बायोमेट्रिक हजेरी सुरु केली. त्यातही काही महाभाग कर्मचार्यांनी बोटाचा बनावट ठसा बनवला आणि कामचोरी करून बोगस हजेरी लावण्याची किमया साधली, मात्र ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने पालिकेने या कामचोरीला चाप लावण्यासाठी बायोमेट्रिक थंब सिस्टीम मोडीत काढली. आता ‘फेशियल बायोमेट्रिक मशीन’द्वारे कर्मचार्यांनी हजेरी लावण्याची कार्यपद्धती 1 जानेवारी 2025 पासून सुरू केली आहे. सध्या महापालिका मुख्यालयात आणि पालिकेच्या आणखीन काही इतर कार्यालयाच्या ठिकाणी या मशिनी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामचोर आणि दांडी बहाद्दर कामगार जेरीस आले आहेत, मात्र महापालिका मुख्यालयात, इतर पालिका विभाग कार्यालयाच्या ठिकाणी घरी जाण्याकरिता आणि वेळेत ट्रेन पकडण्यासाठी अनेक कर्मचारी हजेरी लावण्यासाठी कामाची वेळ (सकाळी 10 ते सायंकाळी 6) संपण्यापूर्वीच काही मिनिटे अगोदरच सदर ‘फेशियल बायोमेट्रिक मशीन’समोर रांग लावत उभे राहतात. ही बाब पालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे पालिका प्रशासनाने त्यास चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका मुख्यालयात उद्घोषणा
कामाची वेळ संपण्यापूर्वीच महापालिका मुख्यालयात प्रशासनाकडून नुकतीच एक उद्घोषणा करण्यात आली. कामगारांनी वेळेपूर्वीच फेशियल बायोमेट्रिक मशीनसमोर रांग लावल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब चुकीची आणि गंभीर बाब असून कामाची वेळ संपल्यानंतरच कामगारांनी रांग लावावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच, वेळेपूर्वीच रांग लावल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कामगारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे सायंकाळी 6 पर्यंत तरी फेशियल बायोमेट्रिक मशीनसमोर कामगारांनी रांग लावल्याचे निदर्शनास आले नाही.