Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईMumbai : मराठीला जगवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाची - ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे

Mumbai : मराठीला जगवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाची – ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे

Subscribe

मुंबई : “फक्त कागदांवर किंवा कायदा केल्याने मराठी भाषा जगणार नाही. तसेच, कोणतेही सरकारी सोपस्कार करून भाषेला जगवता येणार नाही. जोपर्यंत मराठी भाषा ही आपल्या जगण्याचा भाग होणार नाही, तोपर्यंत ती जगणार नाही. मराठीला जगवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाची आहे” असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने गुरुवारी (27 फेब्रुवारी) महापालिका सभागृहात पार पडलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा’ शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. (Mumbai BMC Marathi Bhasha Gaurav Diwas Program celebrated)

हेही वाचा : Vicky Kaushal : विकी कौशलचे मराठीतून भाषण, राज ठाकरेंसमोर म्हणाला… 

“कोणतीही भाषा ही व्यक्ती किंवा समाज जन्माला घालत असते. त्यामुळे, ती जगवण्याची जबाबदारीसुद्धा ती व्यक्ती किंवा त्या समाजावरच असते. कायदा करून जशी भक्ती किंवा श्रद्धा जन्माला घालता येत नाही. तसेच, फक्त कायदा करून भाषाही जगवता येणार नाही.” असे मत उत्तम कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. तसेच, कोणतीही निर्मिती केली किंवा नवीन शोध लावला तर त्यासाठी शब्द जन्माला घालावे लागतात. पण, आपल्याकडे शब्दांची निर्मिती करण्याऐवजी प्रतिशब्द शोधण्यावर भर दिला जातो,” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्यासह विविध उप आयुक्त, संचालक तसेच विविध विभागांचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

अन्य भाषेच्या प्रभावाखाली मराठीच्या वेशीबाहेर कितीतरी बोलीभाषा वटवाघळासारख्या लोंबकळत आहेत. मराठीमध्ये लाखो शब्द आहेत. पण, बहुतेकांना जेमतेम एक टक्का शब्द अवगत असतात. त्या अल्पशा शब्दावलींमध्येच आयुष्यभर ती व्यक्ती लिहिते, विचार करते आणि जगतेही. त्यामुळे, प्रत्येकाने आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अधिकाधिक मराठी शब्दांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. चित्रपटांच्या गाण्यावर थिरकण्यापेक्षा कधीतरी संत जनाबाईंच्या ओवींवरही ठेका धरून पाहावा. त्यातून मिळणारा आनंद अद्वितीय असतो, याची अनुभूती घेण्याबाबत त्यांनी सूचना केली. “प्रशासनातील टिपण्या 100 टक्के मराठी भाषेतच केल्या पाहिजेत, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी प्रशासनाला केली. “आपली मुले इंग्रजी शाळांमध्ये शिकत असली तरी पालकांनी घरामध्ये मराठीमध्येच संवाद साधला पाहिजे. दैनंदिन व्यवहारांमध्येही जाणीवपूर्वक मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. महिलांनी दिवाळीमध्ये कपडे खरेदी करण्यासोबतच दिवाळी अंकही खरेदी करुन मराठी भाषेचा गौरव वृद्धिंगत करावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Edited by Abhijeet Jadhav