Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईMumbai : नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज व्हा, प्रोजेक्ट आर्याच्या शुभारंभावेळी आयुक्तांचे आवाहन

Mumbai : नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज व्हा, प्रोजेक्ट आर्याच्या शुभारंभावेळी आयुक्तांचे आवाहन

Subscribe

मुंबई : “लोणची, पापड, कापडी पिशव्या तयार करून त्यांची विक्री करणार्‍या बचत गटांच्या महिला आता जुनी चौकट ओलांडून रोजगारासाठी मुंबई महापालिका आणि झोमॅटो कंपनी यांचा संयुक्त उपक्रम म्हणून ‘प्रोजेक्ट आर्या’च्या माध्यमातून घरोघरी, कार्यालयांच्या ठिकाणी पुरूषांसोबत खांद्याला खांदा लावून खाद्य पदार्थ वितरण करण्याच्या क्षेत्रात पावले टाकत सीमोल्लंघन करीत आहेत. बचत गटांच्या महिला आता स्वयंसिद्ध होत आहेत. नवनवीन क्षेत्रे महिलांसाठी खुली होत आहेत. त्यासाठी महिलांनी सज्ज राहायला हवे,” असे आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे. (Mumbai BMC Project Arya program Commssioner Bhushan Gagrani)

हेही वाचा : Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय काय? लोणी काळभोरमध्ये फ्री स्टाईल हाणामारीत 3 जखमी 

मुंबई महापालिकेने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बचत गटाच्या महिलांनी अधिकाधिक स्वयंसिद्ध होण्यासाठी आर्थिक मदत देत त्यांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा देण्यासाठी नवीन पाऊल उचलले आहे. घरोघरी, कार्यालयात आवश्यक खाद्यपदार्थांचे वितरण करण्यासाठी आतापर्यंत पुरुषांचा, तरुणांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत होता, मात्र आता मुंबई महापालिकेच्या आर्थिक साहाय्याने बलशाली बनत असलेल्या बचत गटांच्या महिलांना अधिक रोजगार उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने घरोघरी, कार्यालयात खाद्यपदार्थांचे वितरण करणार्‍या झोमॅटो कंपनीशी यशस्वी चर्चा करून पालिकेसोबत संयुक्त उपक्रम म्हणून ‘प्रोजेक्ट आर्या’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बचत गटांच्या 40 महिलांना कंपनीतर्फे दुचाकीचे आणि सुरक्षिततेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी (5 मार्च) मुलुंड विभागात प्रशिक्षित 15 महिलांच्या दुचाकी रॅलीला आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

‘झोमॅटो’ सोबत अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी मुंबई महापालिका ही भारतातील पहिलीच महापालिका ठरली आहे. मुलुंड (पश्चिम) येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमास संचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकर, टी विभागाचे साहाय्यक आयुक्त अजय पाटणे, ‘झोमॅटो’चे मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्वेश, भाजपच्या माजी नगरसेविका समिता कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबई महापालिका सतत विविध योजना, उपक्रम राबवित असते. महापालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून बचत गटांना आर्थिक साहाय्य केले जाते. आता त्याच्याही पुढे जाऊन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा प्रकारचे अभिनव उपक्रम मुंबई महापालिका हाती घेत आहे. कोणतेही काम करताना महिला नियमांचे पालन करतात. साहजिकच ‘झोमॅटो’ सोबतच्या उपक्रमात महिला सहभागी असल्याने मुंबईसारख्या अत्यंत वर्दळीच्या महानगरात वाहतूकही सुरळीत राहण्यास मदत होईल, असे मत आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी व्यक्त केले.

सर्व 24 विभागांमध्ये हा उपक्रम राबविणार-डॉ. प्राची जांभेकर

प्रास्तविक करताना संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी, या उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमासाठी एकूण 30 ते 40 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 15 महिलांची निवड करण्यात आली आहे. आता या महिला खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे काम करणार आहेत. सध्या मुलुंड परिसरात हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल, असे डॉ. जांभेकर यांनी नमूद केले.