मुंबई : होळी सणासाठी नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड केल्यास संबंधितांवर कायदेशीर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.
गुरुवारी 13 मार्च 2025 रोजी होळी सण साजरा करण्यात येणार आहे. या सणाच्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे किंवा महापालिकेच्या ‘1916’ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक तथा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव जितेंद्र परदेशी यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. (Mumbai BMC strict action will be taken against who cut down tree in Holi festival)
1 ते 5 हजारांचा दंड, किंवा आठवडा ते वर्षभर कैदेची शिक्षा
‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, 1975’ अंतर्गत कलम 21 अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / तोडण्यास कारणीभूत होणे, हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते. यावरून मुंबई पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी म्हणाले की, “मुंबईत चोहीकडे हिरवळ दाटलेली असावी, यासाठी प्रत्येक मुंबईकराने प्रयत्न करायला हवेत. आपल्या अवतीभवती असलेली निसर्गसंपदा जोपासणे आणि वृद्धिंगत करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आपणा सर्वांना प्राणवायू देणाऱ्या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.” असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईमध्ये साधारणपणे 29 लाख 75 हजार झाडे आहेत. त्यापैकी 15 लाख 51 हजार 132 झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर 10 लाख 67 हजार 641 झाडे शासकीय इमारती, तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी 1 लाख 85 हजार 964 झाडे रस्त्यांच्या कडेला आहेत. दरवर्षी उद्यान विभागाच्यावतीने नवीन झाडे लावण्यात येतात. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडे हटवावी लागतात. तसचे पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाच्या तडाख्यात मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे मुंबईतील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.