Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईMumbai Fire : मुंबईत घडल्या दोन आगीच्या घटना, तीन जखमी तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी

Mumbai Fire : मुंबईत घडल्या दोन आगीच्या घटना, तीन जखमी तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी

Subscribe

मुंबई : मुंबईकरांच्या रविवार (9 मार्च) हा आगीच्या घटनांमुळे चिंतेचा ठरला. मुंबईमध्ये झालेल्या दोन घटनांनी मुंबईकरांची झोप उडाली. कारण, एकीकडे अंधेरीमध्ये शनिवारी (8 मार्च) रात्री गॅस पाईप लाईन जेसीबीद्वारे रस्त्याचे खोदकाम सुरू असताना फुटल्याने 3 जण जखमी झाल्याचे समोर आले. तर, दुसरीकडे गोरेगावमध्ये लागलेल्या एका आगीत झोपड्या, दुकाने जळाली आहेत. पण यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे समोर आले आहे. असे असताना वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. (Mumbai Gas pipeline blast in andheri and fire in goregaon)

हेही वाचा : Mumbai News : पाण्याची टाकी साफ करताना चार मजुरांचा मृत्यू; एक गंभीर, मुंबईतील नागपाड्यात खळबळ 

गोरेगावमध्ये भीषण आग

गोरेगाव (पूर्व) फिल्म सिटी रोड येथे रविवारी संध्याकाळी उशिराने लागलेल्या भीषण आगीत काही झोपड्या, दुकाने जळाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नाही. महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गोरेगाव (पूर्व), फिल्म सिटी रोड, रत्नागिरी हॉटेल आणि वघेश्वरी मंदिराजवळ रविवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत काही झोपड्या आणि दुकाने यांना या आगीची झळ बसली. त्यामुळे आग भडकली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले, मात्र आगीची दाहकता पाहता अग्निशमन दलाने सायंकाळी 7.08 वाजता आग स्तर- 1 ची असल्याचे आणि त्यानंतर अवघ्या 7 मिनिटानंतर म्हणजे सायंकाळी 7.15 वाजता आग जास्त भडकल्याने स्तर – 2 ची आग असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. सदर आगीवर रात्री उशिराने अग्निशमन दलाने फायर इंजिन आणि वॉटर टँकर यांच्या साहाय्याने नियंत्रण मिळविले आणि आग पूर्णपणे विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, मात्र झोपड्या आणि दुकाने जळाल्याने वित्तीय हानी झाली, मात्र आग का व कशी काय लागली, आगीचे कारण काय, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

अंधेरीत गॅस पाईपलाईन फुटून लागलेल्या आगीत 3 जखमी

अंधेरी (पूर्व) शेर-ए-पंजाब सोसायटी येथे शनिवारी (8 मार्च) रात्री उशिराने रस्त्याखालून गेलेली महानगर गॅस कंपनीची गॅस पाईप लाईन जेसीबीद्वारे रस्त्याचे खोदकाम सुरू असताना फुटली. त्यामुळे गॅस गळती झाली आणि आग लागली. या आगीत चार वाहने जळाली आणि तीन वाहन चालक भाजले. त्यामुळे तिन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अंधेरी (पूर्व), शेर ए पंजाब सोसायटी, तक्षिला, गुरुद्वाराजवळ रस्त्याच्या खालून गेलेली महानगर गॅस निगमची गॅस पाईप लाईन शनिवारी रात्री रस्त्याचे खोदकाम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने फुटली. त्यामुळे गॅस पाईप लाईनमधून गॅस गळती झाली. या गॅसचा आगीशी संपर्क आला आणि त्यामुळे आग लागली. या आगीमुळे दोन दुचाकी, एक तीन चाकी आणि एक चार चाकी अशा चार वाहनांना आगीची झळ बसली. तर, अरविंद कैथल (21 वर्षे) 40 टक्के ते 50 टक्के भाजले, अमन सरोज (22 वर्ष) तीन वाहन चालक 30 टक्के ते 50 टक्के भाजले. त्यांना तातडीने नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण अरविंद कुमार कैथल आणि अमन सरोज यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून डामा डिस्चार्ज घेतला. तर सुरेश कैथल यांच्यावर ट्रॉमा केअर रुग्णालय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.