मुंबई : मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी (28 फेब्रुवारी) मध्य रेल्वेवरील आंबिवली ते टिटवाळा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे रुळांजवळ असलेल्या गवताला आग लागून त्या आगीमध्ये सिग्नल यंत्रणेच्या केबल्स जळाल्या. त्यामुळे सिग्नल यंत्रणा ठप्प होऊन त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटांनी उशिरा धावत होती. अशामध्ये ठाणे, दादर स्थानकावर कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पण, ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या या गोंधळामुळे मध्य रेल्वेचा पुन्हा एकदा बोजवारा उडाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. (Mumbai local Central Railway disrupted due to grass fire between ambivali titwala)
हेही वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विद्यमान आमदाराचा प्रवेश; पुण्यात पक्षाचे बळ वाढले
समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (28 फेब्रुवारी) आंबिवली ते टिटवाळा या स्थानकादरम्यान गवताला आग लागून, त्या आगीमध्ये सिग्नल यंत्रणेच्या केबल्सही सापडल्या. केबल जळल्यानंतर सिग्नल यंत्रणा बंद होऊन वाहतूक ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करत दुरुस्तीचे काम सुरू केले. पण, सुरक्षेच्या कारणास्तव लोकल ट्रेनची वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती. त्यामुळे लोकलच्या एकामागोमाग लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांची मोठी रखडपट्टी झाली. बराच काळ रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, रेल्वे रुळांच्या बाजूला जंगल वाढू दिल्याने उन्हाळ्यात या गवताला आग लागल्याने सिग्नल केबल जळाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे गवत वेळीत कापून टाकावे, असे रेल्वेकडे वारंवार प्रवाशी संघटना मागणी करत असतात.
सीएसएमटी स्थानकावर फलाटाचे विस्तारीकरण
सीएसएमटी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 12 आणि 13ची लांबी 24 डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढवण्यात येत आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशामध्ये मध्य रेल्वेने दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे मध्यरात्रीच्या वेळी हा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री 5 तासांचा तर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पहिला ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शुक्रवारी रात्री 11.30 ते शनिवारी पहाटे 4.30 वाजताच्या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दुसरा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा/वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धिम्या मार्ग/अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री 11.15 ते रविवारी सकाळी 9.15 या कालावधीत घेण्यात येणार आहे.