Special Railway Megablock : मुंबई : मुंबईकरांचा मार्च महिन्याचा पहिलाच वीकेंड मेगाब्लॉकमध्ये जाणार आहे. रात्रकालीन मेगाब्लॉक असल्याने शनिवार आणि रविवारी रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर शनिवारी रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे रात्री उशीरा घरी परतणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉक काळातील वेळापत्रक पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (mumbai megablock major changes on western central railway tonight check details)
पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा ब्लॉक
गर्डर बसवण्याच्या कामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान 13 तासांचा ब्लॉक असेल. तर मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणासाठी 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द होणार असून काही गाड्या धीम्या मार्गाने वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे पूर्वनियोजन करावे लागणार आहे.
या ब्लॉकच्या कालावधीत पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळील गर्डर उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील. तर चर्चगेट लोकलचा प्रवास वांद्रे आणि दादर स्थानकांतच संपेल. काही लोकल वांद्रे आणि दादर स्थानकांतून विरार आणि बोरिवलीच्या परतीच्या प्रवासासाठी चालवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवर 2 मार्चपर्यंत विशेष ब्लॉक
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणासाठी तसेच प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकलसेवा रद्द करण्यात येणार आहेत. तर ब्लॉक कालावधीमध्ये 59 लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहतील. 47 मेल-एक्स्प्रेसवर या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकावर थांबवण्यात येणार असून त्याच स्थानकावरून त्या परतीचा प्रवास सुरू करतील.
शेवटच्या लोकल गाड्या
ठाण्यासाठी शेवटची स्लो गाडी रात्री 10.46 वा. सीएसएमटीहून सुटेल, ती 11.41 मिनिटांनी ठाण्याला पोहोचेल
बदलापूरसाठी शेवटची स्लो लोकल रात्री 10.25 मिनिटांनी सुटेल. ती रात्री 11.52 वा. बदलापूर येथे पोहोचेल.
सीएसएमटीसाठी शेवटची स्लो गाडी रात्री 8.55 मिनिटांनी टिटवाळा येथून सुटेल. ती रात्री 10.28 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल.
सीएसएमटीसाठी शेवटची फास्ट लोकल रात्री 9:26 मिनिटांनी कसारा येथून सुटेल. ती रात्री 10:35 वा. सीएसएमटीला पोहोचेल.