मुंबई : मुंबई महापालिकेच्या मिठी नदी आणि नालेसफाई कामांच्या निविदेत अधिकार्यांनी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून 200 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी केला होता. तत्पूर्वी शिवसेनेचे (उबाठा) नेते, आमदार आणि माजी मंत्री अॅड. अनिल परब यांनीही आरोप केला होता, मात्र मुंबई महापालिकेने हे आरोप फेटाळून लावले आहेत, परंतु असे असले तरी घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर पालिकेने कंत्राटदारांशी वाटाघाटी केल्यावर किमान 3 ते 10 टक्के चढे दर भरणार्या कंत्राटदारांनी लागलीच 20 टक्के कमी दरात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे घोटाळा बाहेर पडू नये, या भीतीने या कंत्राटदारांनी चढे दर कमी केले की काय? तसेच, बिथरलेल्या पालिका अधिकार्यांनीच या निविदेत भरलेले चढे दर कमी करण्यासाठी कंत्राटदारांना संधी उपलब्ध केली की काय? अशी शंका नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (Mumbai Mithi River scam allegations by mns and BMC Denies)
हेही वाचा : Mumbai BMC : बीएमसी सफाई कामगारांचा लढा यशस्वी, सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाच्या नंतर अशा तीन टप्प्यात मिठी नदीतील गाळ काढणे आणि लहान-मोठ्या नाल्यांची सफाई करणे आदींची कामे केली जातात. त्यासाठी महापालिका निविदा प्रक्रिया राबवते. त्यामधील अटी व शर्ती यांचे पालन करीत सदर कागदपत्रांच्या आधारे पात्र ठरणार्या आणि लघुत्तम दर भरणार्या कंत्राटदारांनाच नालेसफाईची कोट्यवधी रुपयांची कामे देण्यात येतात, मात्र यंदाच्या नालेसफाई कामांसाठी पालिका तब्बल 500 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करणार आहे, मात्र त्यासाठी महापालिकेत कंत्राटदार आणि संबंधित अधिकार्यांनी संगनमत केले आहे. त्यांनी नालेसफाई कामांसाठी जास्त दर भरणार्या कंत्राटदारांना पात्र ठरविले आहे. त्यामुळे पालिकेचे 200 ते 250 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे, असे आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले होते.
आता पालिका प्रशासनाने त्या आरोपांची गंभीर दखल घेत मिठी नदी गाळ काढण्याच्या कामात आणि नालेसफाईच्या कंत्राट कामांत कोणताही भ्रष्टाचार झालेला नसल्याचे सांगत सदर आरोप हे फेटाळून लावले आहेत. नालेसफाई कामांसाठी निविदाकारांनी निविदांवर अधिक 3.90 ते अधिक 10 टक्के दरम्यान चढ्या दराने निविदा भरल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर संबंधित निविदाकारांसमवेत 6 मार्च 2025 रोजी वाटाघाटी करत चढे दर अधिक 3 टक्के ते उणे 20 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत. वाटघाटीनंतर खाली आलेल्या दरानुसार निविदा स्वीकृत करण्यात आल्या आहेत. महापालिकेने नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामाची संपूर्ण पारदर्शकता राखली असून ती कायम ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन वचनबद्ध आहे, असा दावा पालिकेने केला आहे. सन 2025 आणि 2026 या वर्षासाठी मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत परिमंडळ- 1 वगळता उर्वरीत सहा परिमंडळासाठी सहा निविदा मागविण्यात आल्या आहेत. 28 फेब्रुवारी 2025 आणि 1 मार्च 2025 रोजी पात्र निविदाकारांचे देकार उघडण्यात आले. ज्या निविदाकारांनी निविदा भरल्या आहेत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. निविदा भरण्यास निविदाकार पात्र असल्याचे त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून सिध्द होत आहे, असे पालिकेने म्हटले आहे.