मुंबई : मुंबई महापालिकेने गेल्या अडीच वर्षात 2 लाख 32 कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली आहेत. मात्र कंत्राटदारांची बिले पेड करण्यासाठी पालिकेला पैशांची जास्त गरज आहे. महापालिकेचे विविध बँकांत तब्बल 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी गेल्या जानेवारीपर्यंत होत्या. आता त्यात आणखीन वाढ झाली असून त्या 82 हजार 854 कोटींवर गेल्या आहेत. त्यापैकी 16 हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध बँकांत 65 हजार कोटी रुपयांच्या ठेवी शिल्लक राहणार आहेत. मात्र सदर 82 हजार कोटी रुपयांपैकी 50 टक्के मुदत ठेवी या पालिका कर्मचाऱ्यांची देणी, कंत्राटदार यांची अनामत रक्कम यांपोटी तशाच राहणार आहेत. पालिकेला त्यांना हात लावता येणार नाही. (Mumbai Municipal Corporation to liquidate fixed deposits worth Rs 16 thousand crore)
आरोग्य खात्यासाठी २१७२ कोटींची तरतूद
मुंबई महापालिकेने तीन प्रमुख रुग्णाले, 17 सर्वसाधारण रुग्णालये, प्रसुतीगृहे, दवाखाने या ठिकाणी रुग्णांना विविध स्वरूपाच्या वैद्यकीय सेवासुविधा, औषधोपचार देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 2172 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नायर, केईएम आणि सायन रुग्णालयाच्या विस्तारीकरण, देखभाल दुरुस्ती, दर्जोंनाती,आधुनिक वैद्यकीय सुविधा, रुग्णालय बेड क्षमता वाढविणे, डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांसाठी निवासस्थाने उभारणे, घरोघरी वैद्यकीय तपासणी करणे, शून्य प्रिस्क्रेप्शन धोरण लागू करणे वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणे, असंसर्गजन्य रोग प्रतिबंध कार्यक्रम राबविणे, कॅन्सर तपासणी करणे, लसीकरण योजना, बालमृत्यू कमी करणे, झोपडपट्टीत मुलांसाठी 33 आरोग्य केंद्रात किशोर केंद्रे सुरू करणे, कुपोषित बालकांवर उपचार करणे आदी कामासाठी सदर निधीची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा – Mumbai BMC Budget : उत्पन्न वाढ करताना मुंबई पालिकेची प्रशासकीय खर्चात बचत
घनकचरा व्यवस्थापनासाठी 5,548 कोटींची भरीव तरतूद
या अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 5,548 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील देवनार डंपिंग भूमीवर 600 टन प्रतिदिन कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्यातून 7 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2025 पासून सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच, मुंबईत दररोज निर्माण होणारे डेब्रिज जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने दहिसर येथे प्लांट बनवला आहे. आणखीन एक प्लांट बनविण्यात येणार आहे. तसेच मुलुंड येथील डंपिंग ग्राउंडवरील जमा कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावून सदर जागा कचरा मुक्त करण्यात येणार आहे. देवनार डंपिंग येथे बायो सींएनजी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी
- रस्ते आणि वाहतुकीसाठी – 16434.04 कोटी
- मुंबई किनारी रस्ता दक्षिण बाजूसाठी – 1507.24 कोटी
- मुंबई किनारी रस्ता उत्तर बाजूसाठी – 4300 कोटी
- गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी – 1958.76 कोटी
- घनकचरा व्यवस्थापन आणि परिवहन – 6064.98 कोटी
- आरोग्य विभागासाठी – 7380 कोटी
- पर्जन्य जलवाहिन्यांसाठी – 3039.25 कोटी
- प्राथमिक शिक्षणासाठी – 3955.64 कोटी
- बेस्ट अनुदान – 1000 कोटी रुपये
- शिक्षण विभाग – 3241 कोटी रुपये
- घनकचरा व्यवस्थापन विभाग – 5548 कोटी रुपये
- पर्जन्य जलवाहिनी विभाग – 3039 कोटी रुपये
- कोस्टल रोड प्रकल्प – 1545 कोटी रुपये
- रस्ते आणि वाहतूक विभाग – 6519 कोटी रुपये
- पूल विभाग – 8369 कोटी रुपये
- प्रमुख रुग्णालये – 2455 कोटी रुपये
- वैद्यकीय महाविद्यालये – 579 कोटी रुपये
- विशेष रुग्णालये – 306 कोटी रुपये
- जल अभियंता विभाग – 4372 कोटी रुपये
- पाणी पुरवठा प्रकल्प खाते – 4056 कोटी रुपये
- मलनि:सारण प्रचालन विभाग – 1972 कोटी रुपये
- मलनि:सारण प्रकल्प खाते – 439 कोटी रुपये
- मलनि:सारण प्रकल्प कामे – 6532 कोटी रुपये
- नगर अभियंता विभाग – 3395 कोटी रुपये
- विकास नियोजन विभाग – 1831 कोटी रुपये
- उद्यान आणि प्राणिसंग्रहालय – 731 कोटी रुपये
- कोळीवाड्यांच्या विकासासाठी – 25 कोटी रुपयांची तरतूद
हेही वाचा – BMC Budget 2025 : मुंबईच्या झोपडपट्टीतील व्यावसायिकांना पालिकेचा दणका, वाचा सविस्तर