मुंबई : ठाणे शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार दररोज आणखीन किमान 300 दशलक्ष लिटर वाढीव पाणीपुरवठा पाहिजे आहे. त्यापैकी 100 दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी मुंबई महापालिकेकडून पाहिजे आहे. पण मुंबई महापालिकेच्या जलअभियंता खात्यातील अधिकाऱ्यांनी ठाणेकरांना 100 दशलक्ष लिटर वाढीव पाणीपुरवठा करण्यास नकारघंटा दर्शवली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी मुंबईकडून 30 दशलक्ष लिटर पाणी वाढवून दिले होते, परंतु आता आणखीन 100 दशलक्ष लिटर पाणी वाढवून देणे मुंबई महापालिकेला शक्य नाही. फारतर आणखीन 15 ते 20 दशलक्ष लिटर पाणी देण्यासाठी प्रयत्न करू, अशी भूमिका मुंबई महापालिकेकडून घेण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे आता ठाणे महापालिका आणि तेथील राजकीय नेते, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर काय निर्णय घेतील, याकडे ठाणेकर आणि मुंबईकर यांचे लक्ष लागून राहणार आहे. ठाणे शहर गेल्या काही वर्षात कात टाकत आहे. या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. (Mumbai News BMC refused to to provide an additional 100 million liters of water supply to Thane)
हेही वाचा : Mumbai : पर्यावरणपूरक बेकर्यांना सरकारी अनुदान, महानगर गॅस कंपनीची मदत
एकीकडे ठाणे अनधिकृत इमारत बांधकामे झाल्याने चांगलेच गाजत आहे, तर दुसरीकडे ठाणे खाडी, डोंगर परिसरात अनधिकृतपणे झोपड्या वाढत आहेत. ठाण्यात वाढते शहरीकरण, वाढत्या झोपड्या, वाढत्या अनधिकृत इमारती आदींमुळे ठाणे शहर परिसराला दररोज विविध जल स्त्रोतामधून होत असलेला 485 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. ठाण्याला दररोज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेमकडून 114 दशलक्ष लिटर, ठाण्याचे स्वतःच्या जल स्त्रोतामधून 250 दशलक्ष लिटर, तर मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. ठाण्याला दररोज 485 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते, मात्र मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हे असताना मुंबई महापालिकेने ठाण्याला आणखीन 30 दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढवून दिला असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
ठाण्याला पाहिजे आणखीन 300 दशलक्ष लिटर पाणीसाठा
वास्तविक, ठाणे महापालिका प्रशासनाने भविष्याची चाहूल घेत आगामी 30 वर्षात दररोज किमान 1116 दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्यकता भासणारा आराखडा तयार केला आहे. आता सध्या ठाणेकरांसाठी 300 दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. या 300 दशलक्ष लिटर पाण्यापैकी पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणातून आणि देहरजे धरण प्रकल्पातून प्रत्येकी 100 दशलक्ष लिटर इतके पाणी पाहिजे आहे, तर मुंबई महापालिकेकडून दररोज 100 दशलक्ष लिटर इतका वाढीव पाणीपुरवठा पाहिजे आहे. स्टेम आणि एमआयडीसीकडून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे.
मुंबई शहराला मुंबईतील कमी क्षमता असलेल्या विहार आणि तुळशी तलावाच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्हा परिसरातील भातसा, अप्पर वैतरणा, मध्या वैतरणा, तानसा आणि मोडक सागर या पाच तलावांतून असे एकूण सात तलावातून दररोज मुंबईसाठी 4 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, मुंबई महापालिकेला ठाणे जिल्हा परिसरातील प्रमुख पाच तलावातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे हे सामाजिक भान राखून मुंबई महापालिका ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 115 दशलक्ष लिटर, भिवंडी – निजामपूर महापालिका क्षेत्रात दररोज 45 दशलक्ष लिटर आणि सदर प्रमुख तलाव क्षेत्रातील खेडेगावांना दररोज 20 दशलक्ष लिटर ( प्रक्रिया न केलेले पाणी) असे एकूण 180 दशलक्ष लिटर पाणी ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्रात पुरवते. त्यामुळे मुंबईला दररोज होणारा 4 हजार दशलक्ष लिटर आणि ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्रात होणारा दैनंदिन 180 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता मुंबई आणि ठाणे, भिवंडी महापालिका यांना दररोज 4180 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात ठाण्याला वाढीव पाणी
वास्तविक, मुंबई महापालिकेकडून तीन वर्षांपूर्वी ठाण्याला 85 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत होता, मात्र मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे असताना ठाण्याला दररोज आणखीन 30 दशलक्ष लिटर इतके पाणी वाढवून देण्यात आले. आता पुन्हा आणखीन 100 दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची मागणी ठाणे पालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेकडे एका बैठकीदरम्यान केली आहे, मात्र मुंबईला सध्या होत असलेला दैनंदिन 4 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा कमी पडत आहे. त्यातही दररोजच्या पाणी पुरवठ्यातील 34 टक्के पाणीगळती की चोरी यामुळे वाया जाते. त्यामुळे मुंबईला स्वतःलाच पाण्याची कमतरता अगोदरच भेडसावत आहे. त्यात आणखीन 100 दशलक्ष लिटर वाढीव पाणी देणे शक्य होणार नाही, असे जलअभियंता खात्यातील सूत्रांनी सांगितले, मात्र किमान आणखीन 15 – 20 दशलक्ष लिटर वाढीव पाणी कसेतरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे संबंधित पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाणेकरांची 100 दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची मागणी मान्य करणे शक्य होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र या वाढीव पाण्यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिका प्रशासकिय अधिकाऱ्यांची ज्यावेळी बैठक होईल, त्यावेळी त्यावर नेमका काय निर्णय घेण्यात येईल, ते बघावे लागेल.