Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईMumbai : होळी, रंगपंचमीसाठी पाण्याचे नो टेन्शन, मुंबईकरांसाठी ही खुशखबर

Mumbai : होळी, रंगपंचमीसाठी पाण्याचे नो टेन्शन, मुंबईकरांसाठी ही खुशखबर

Subscribe

मुंबई : सध्या मुस्लीम धर्मीयांचा रमजान सुरू आहे. तसेच, हिंदू धर्मियांची होळी आणि रंगपंचमी 13 व 14 मार्च रोजी आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता भासत आहे. पाणी समस्येचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने याची दाखल घेत गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईकरांच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यात ८० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याच्या वाढ केली आहे. त्यामुळे आता रमझान आणि होळी, रंगपंचमीला पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांतील पाणीसाठा पाहता नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची वारेमाप उधळण न करता काटकसरीने वापर करण्याचे आवाहन देखील महापालिका वारंवार करते आहे. (Mumbai no water shortage in festival of Holi due to suffient water supply)

हेही वाचा : Mumbai : घोटाळ्याच्या आरोपांनंतर नालेसफाईचे दर 20 टक्के उणे, घोटाळा झाल्याचा महापालिकेकडून नकार 

मुंबईला ईशान्य मुंबईतील विहार आणि तुळशी या दोन छोट्या तलावांमधून आणि ठाणे जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा आणि भातसा या पाच तलावांमधून अशा एकूण सात तलावांमधून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. वास्तविक, महापालिका ४,००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवले आहे. महापालिका जल अभियंता खाते दरवर्षी पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबर रोजी तलावांतील जमा पाणी साठ्याचा आढावा घेऊन पुढील वर्षभरासाठी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करते. त्यानुसार, मुंबईला पावसाळा संपल्यावर १,ऑक्टोबर रोजी सात तलावात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा असणे आवश्यक असते. मात्र त्यापेक्षा अगदी गंभीर दखल घेण्याइतपत पाणीसाठा तलावात जमा असेल तर पालिकेला किमान ५ टक्के ते १५ टक्क्यांपर्यंत पाणी कपात करणे भाग पडते.

सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या सात तलावातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. तर, नेहमीप्रमाणे पावसाळा ७ जूननंतर म्हणजे १५ जूनपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेला सात तलावांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेणे आणि त्याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मुंबईत कुर्ला, घाटकोपर, भांडूप, मालाड, गोरेगाव, भायखळा , देवनार, मानखुर्द, परळ चेंबूर आदी काही ठिकाणी दररोज होणारा पाणीपुरवठा हा कमी प्रमाणात होत असल्याच्या काही लोकांच्या तक्रारी आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील पाणी समस्येवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होते. त्याचप्रमाणे मुस्लीम धर्मीयांचा रमजान महिना चालू आहे. हिंदू धर्मीयांचा होळी सण १३ मार्च रोजी तर रंगपंचमी उत्सव १४ मार्च रोजी आहे. त्यासाठी काही तरी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्याच्या अनुषंगाने महापालिकेने गेल्या १५-२० दिवसांपासून मुंबईच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यात ८० दशलक्ष लिटर पाण्याची वाढ केली आहे. नंतर आवश्यकतेनुसार पुन्हा तलावातील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहून वाढीव पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.