मुंबई : होळी-धूलिवंदननिमित्त मुंबईकरांसाठी पोलिसांकडून काही नियम जारी करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लघंन करू नये तसेच तसेच होळी आणि धूलिवंदनाचा सण आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान शहरात कुठलेही अनुचित प्रकार घडू नये तसेच या सणाला गालबोट लागू नये म्हणून शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Mumbai Police to deploy thousands of cops across city for Holi celebrations)
हेही वाचा : Uday Samant : महापालिकेत घनकचरा व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ समिती, मंत्री उदय सामंतांची माहिती
गेल्या काही वर्षांत होळी आणि धूलिवंदनादरम्यान रस्त्यावरून जाणार्या पादचार्यांवर रंगीत फुगे मारणे, महिलांशी अश्लील संभाषण करणे, अश्लील हावभाव करुन गाणी गाणे आदी प्रकारात लक्षणीय वाढ झाली होती. त्यातून अनेकदा जातीय तणाव आणि शांतता भंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा सण साजरा करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची नागरिकांनी पुरेपुरे काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गुरुवारी 13 मार्चला होळी आणि 14 शुक्रवारी धूलिवंदन असल्याने अनेक ठिकाणी होळी पेटवून एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सणाला कुठेही गालबोट लागू नये तसेच अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी तयारी केली आहे.
विविध ठिकाणी नाकाबंदी
या दोन दिवसांत शहरात सात अतिरिक्त पोलीस आयुक्त, एकोणीस पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1767 पोलीस अधिकारी, 9145 पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी टीम, बीडीडीएस टीम, होमगार्डस आदींना मदतीसाठी ठेवण्यात आले आहे. पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले असून गर्दीच्या ठिकाणी गस्त आणि फिक्स पॉईट बंदोबस्त नेमण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लघंन व ड्रंक अॅण्ड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमभंग करणार्या आस्थापना आणि अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणार्या, महिलांशी गैरवर्तन करणार्या, अनधिकृतपणे मद्य विक्री करणार्या आस्थापना, ड्रग्ज सेवन आणि विक्री करणार्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.