मुंबई : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुंबई महापालिकेने खाद्यपदार्थ वितरीत करणाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या झोमॅटो कंपनीसोबत ‘प्रोजेक्ट आर्या’ नावाचा संयुक्तिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुरुषांच्या सोबतच आता महिलासुद्धा खांद्याला खांदा लावून ‘झोमॅटो’ कंपनीमार्फत बुधवारपासून (5 मार्च) मुलुंड विभागात घरोघरी, कार्यालयात महिला बचत गटाच्या 15 प्रशिक्षित महिला खाद्यपदार्थ वितरण करण्याचे काम सुरू करणार आहेत. त्यामुळे महिला बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, झोमॅटो कंपनीकडून सदर महिलांना विविध सेवा-सुविधा, संरक्षण, विमा कवच, त्यांच्या मुलांना इतर सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणजे, महिला बचत गटांसाठी अशाप्रकारे उपक्रम राबविणारी मुंबई महापालिका ही भारतातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे. (Mumbai Project Arya for women self help groups in city)
हेही वाचा : Mumbai Crime : अल्पवयीन मुलीवर पेट्रोल ओतून मित्रानेच पेटविले, अंधेरीच्या मरोळमधील घटना
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिकेचा पुढाकार
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबई महापालिका सतत विविध योजना, उपक्रम राबवित असते. महापालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून बचत गट स्थापन करून महिलांचे आर्थिक सबलीकरणही करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबई महापालिका आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोच करणारी ‘झोमॅटो’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आर्या’उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार आता खाद्य पदार्थ वितरणाच्या क्षेत्रातही महिला बचत गट आपला ठसा उमटविणार आहेत.
बुधवारपासून ‘प्रोजेक्ट आर्या’चा शुभारंभ
‘प्रोजेक्ट आर्या’चा शुभारंभ 5 मार्च 2025 पासून मुलुंड विभागात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते तसेच संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, झोमॅटोचे मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश आहुजा यांच्या उपस्थितीत मुलुंड (पश्चिम) येथील कालिदास नाट्यगृहात करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी एकूण 30 ते 40 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 15 महिलांची निवड करण्यात आली आहे. आता या महिला खाद्य पदार्थ पोहोचविण्याचे काम करणार आहेत.
महिला बचतगटाची नवीन क्षेत्रात उडी
बचत गट म्हंटले की लोणची, पापड तयार करणे, कापडी पिशव्या तयार करणे, सजावटीची साहित्य तयार करणे अशी कामे आपल्या डोळ्यासमोर येतात, मात्र आता ही पारंपरिक चौकट ओलांडून महिलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्टया अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतील धावते आयुष्य, बदलती जीवनशैली, वेळेची कमतरता, नोकरी-व्यवसायामुळे होणारी फरफट यामुळे अनेकांना पोटपूजा करण्यासाठी विविध उपाहारगृहे, भोजनालय, खानावळी यावर अवलंबून राहावे लागते. साहजिकच अशाप्रकारे खाद्यपदार्थ कार्यालयात, घरी उपलब्ध झाल्यास अनेकांची सोय होते. या क्षेत्रात आता अनेक व्यावसायिक कंपन्या सेवा देतात. त्यातील नामांकीत असलेल्या झोमॅटो कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेने बचत गटाच्या महिलांसाठी ‘प्रोजेक्ट आर्या’सुरू केला आहे.
महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण
खाद्यपदार्थ वितरणात आतापर्यंत पुरुषांचीच संख्या अधिक आढळते. हीच बाब अधोरेखित करून मुंबई महापालिकेने यासाठी बचत गटाच्या 30 ते 40 महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच स्व:रक्षणाचे धडे दिले आहेत. यासोबतच मोबाईल ॲपद्वारेही या महिला प्रसंगी गरज भासल्यास आपल्कालीन संदेश (एसओएस) पाठवून स्वत:चे रक्षण करू शकणार आहेत.
सहभागी महिलांना सुविधा आणि त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती
प्रोजेक्ट आर्यामध्ये सहभागी महिलांना नोंदणी प्रक्रिया, प्रशिक्षण, सुरक्षा उपायबाबतच्या योजना आणि विमा सुविधा झोमॅटोकडून प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अपघात विमा, मातृत्व विमा, कुटुंबासाठी विमा, मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांसाठी रजा, नि:शुल्क सुरक्षा साहित्य, कुटुंबासाठी आदी बाबींचा समावेश आहे. सध्या मुलुंड (टी वॉर्ड) येथे इच्छुक महिलांकरीता झोमॅटो अँपवर नोंदणीसाठी प्रशिक्षण सत्रे आणि इलेक्ट्रिक दुचाकी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात आहेत, अशी माहिती संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.