Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईMumbai : मुंबईत रस्ते खोदकामास मनाई, मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश

Mumbai : मुंबईत रस्ते खोदकामास मनाई, मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश

Subscribe

मुंबई : सध्या मुंबईत रस्‍ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. रस्‍ते विकसित करतानाच उपयोगिता वाहिन्‍यांची देखील कामे सुरू आहेत. एकदा रस्‍तेविकास झाला की, त्‍या रस्‍त्‍यावर खोदकाम, चर करायला तात्‍काळ प्रभावाने मनाई करण्‍यात यावी. त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्‍याने रस्‍ते खोदकाम करू नये, असे स्‍पष्‍ट निर्देश महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (Mumbai road work banned by Mumbai Municipal Commissioner’s instructions)

हेही वाचा : Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवा, विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव 

मुंबई महापालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण 324 किलोमीटर (698 रस्‍ते) तर दुसऱ्या टप्प्यात 377 किलोमीटर (1420 रस्‍ते) असे एकूण मिळून 701 किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्‍पा 1 मधील 75 टक्‍के कामे आणि टप्‍पा 2 मधील 50 टक्‍के कामे 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे.

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामांचा नुकताच आढावा घेतला. अधिकारी, कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन रस्‍ते कामांना अधिक गती देण्‍याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये, यासाठी 22 फेब्रुवारी 2025 नंतर कोणत्याही नवीन रस्त्यांचे खोदकाम करण्‍यास मनाई करण्यात आली आहे. सर्व रस्ते कामे व त्या संबंधित कामे देखील 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे सक्त निर्देश महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत. सर्व परिमंडळ उप आयुक्‍त, विभागीय सहायक आयुक्‍त, प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक), प्रमुख अभियंता (पूल), प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या), जल अभियंता, नगर अभियंता, प्रमुख अभियंता (मलनिस्‍सारण प्रचालन), प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्‍प), प्रमुख अभियंता (विकास नियोजन) आदी खात्यांनी या निर्देशांचे पालन करावे, असे महापालिका आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे.


Edited by Abhijeet Jadhav