मुंबई : शहर विभागात काँक्रिटीकरण कार्यस्थळी नागरिकांसाठी माहिती फलक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘क्यू आर कोड’ स्कॅन करण्याची सुविधा देखील पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘क्यू आर कोड’ मोबाईलद्वारे स्कॅन केल्यावर नागरिकांना रस्ते काम सुरु केल्याचा दिनांक, काम संपुष्टात येण्याचा दिनांक, कामाचा कालावधी, रस्त्याची लांबी, रुंदी, कामाचे ठिकाण इत्यादी माहिती विनासायास उपलब्ध होत आहे. सदर ‘क्यू आर कोड’ उपक्रम नागरिकांना माहिती उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचा असून हा उपक्रम इतर विकास कामांच्या ठिकाणी देखील राबविता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर (प्रकल्प) यांनी दिली आहे. (Mumbai Roads Information on development works through QR code, orders of Additional Commissioner)
हेही वाचा : Mumbai : नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज व्हा, प्रोजेक्ट आर्याच्या शुभारंभावेळी आयुक्तांचे आवाहन
मुंबई महापालिकेने रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. शहर विभागात देखील काँक्रिटीकरण कामे अधिक वेगाने आणि गुणवत्तापूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. मुंबई महापालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण 324 किलोमीटर (698 रस्ते) तर दुसर्या टप्प्यात 377 किलोमीटर (1420 रस्ते) असे एकूण मिळून 701 किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभागातील एकूण 503 रस्त्यांचा समावेश आहे. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अलीकडे म्हणजे 27 फेब्रुवारी 2025 रोजी शहर विभागातील अधिकारी, कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन रस्ते कामांना अधिक गती देण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी नुकतीच दक्षिण मुंबईतील हुतात्मा स्मारक चौकाजवळील पुरुषोत्तम ठाकूरदास मार्ग आणि काळबादेवी येथील आर. एस. सपारे मार्ग काँक्रिटीकरण कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, पूर्वी केलेल्या काँक्रिटीकरण कामाचीदेखील त्यांनी पाहणी केली. यावेळी महापालिकेचे प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (शहर) डॉ. विशाल ठोंबरे, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्रा. सोलोमन, गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे उपसंचालक तथा वरिष्ठ प्राध्यापक के. व्ही. कृष्ण राव या पाहणी दौर्यात सहभागी झाले होते. त्यांनी दौऱयाप्रसंगी महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. तसेच, तांत्रिक बाबींविषयी सूचना देखील केल्या. काँक्रिटीकरण कामासाठी कंत्राटदारांनी तुर्भे (ठाणे), वडाळा येथे ’ रेडी मिक्स काँक्रिट प्लांट’ उभारले आहेत. तेथून तयार मिश्रण (रेडी मिक्स काँक्रिट) प्रकल्पस्थळी आणले जाते. एकाच वाहनातून आणलेले सिमेंट मिश्रण २-३ टप्प्यात, विविध ठिकाणी ओतले असता गुणवत्ता तपासणीत येणारी विविध निरिक्षणे नेमक्या कोणत्या कारणांमुळे आणि का येतात, किती मर्यादेपर्यंत फरक अनुज्ञेय राहील याबबत प्रा. राव यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
हेही वाचा : Navi Mumbai News : नवी मुंबईत सापडल्या बारावीच्या उत्तरपत्रिका, तुमच्या मुलांनी बारावीची परीक्षा दिली आहे का
‘पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट’ (पीक्यूसी) करण्यापूर्वी रस्त्याचा पृष्ठभाग (ड्राय लीन काँक्रिट) खडबडीत नसावा, तो समतल पातळीत असेल तेवढा अधिक चांगला असे प्रा. राव यांनी नमूद केले. पुरुषोत्तम ठाकूरदास मार्ग येथे 200 मिलीमीटर जाडीचे पीक्यूसी करताना 1 मीटर बाय 1 मीटर तुकड्याचे विभाजन (बे कट) करण्यात आले आहे. या पद्धतीमुळे रस्त्यांना तडे जात नाही, असे निरीक्षण नोंदवित प्रा. राव यांनी समाधान व्यक्त केले. या पाहणीदरम्यान क्यूब टेस्ट, स्लम्प टेस्ट, बार टेस्ट आदी तांत्रिक चाचण्या करण्यात आल्या. रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे सुरू आहे का याची तपासणी याद्वारे करण्यात आली. वाहतुकीसाठी नुकत्याच खुल्या केलेल्या काँक्रिट रस्त्याच्या पृष्ठभागाची ‘सॅण्ड पॅच’ चाचणी यावेळी करण्यात आली. ज्या द्वारे रस्त्याच्या पृष्ठभागाचा पोत, खोली याची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी खातरजमा केली. तसेच, काँक्रिटीकरण कामातील विविध आव्हानांच्या अनुषंगाने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी.) तसेच गुणवत्ता व्यवस्थापन व संनियंत्रण संस्थेचे प्रतिनिधींसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पालिका अभियंते, आयआयटी तज्ज्ञांची विचारमंथन कार्यशाळा
पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे आणि शहर विभागात काँक्रिटीकरण कामांना वेग आला आहे. या कामांचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणीचे कामकाज सुरू आहे. आयआयटीच्या चमू (टीम) ने नोंदविलेली निरीक्षणे, महापालिका अभियंत्यांना कार्यस्थळी आलेले अनुभव, प्रत्यक्ष कामकाजातील आव्हाने यावर विचारविनिमय व्हावा, आयआयटी तज्ज्ञांनी संवाद साधावा, महापालिका अभियंत्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी 13 मार्च रोजी पवई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या सभागृहात विचारमंथन (ब्रेन स्टॉर्मिंग) कार्यशाळा आयोजित करावी, असे निर्देश देखील अभिजित बांगर यांनी दिले.