Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईMumbai : साकीनाका परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, वाचा सविस्तर

Mumbai : साकीनाका परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, वाचा सविस्तर

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेच्या साकीनाका परिसरात हॉटेल, इमारत, विश्रामगृहाचे उभारलेले अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करून जमीनदोस्त केले. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम उभारणाऱ्या भूमाफियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर, अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना पालिकेने सदर कारवाईद्वारे चांगलाच इशारा दिला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे या अनधिकृत बांधकामांवरून न्यायालयाकडून पालिकेचे कान टोचले जात आहेत. त्यामुळे आता महापालिकेला सदर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे भाग आहे. (Mumbai Sakinaka BMC took action against unauthorized constructions)

हेही वाचा : Central Government : केंद्राचा न्यायालयीन खटल्यांवर 400 कोटींचा खर्च, आकडेवारीवरून उघड 

मुंबईमधील कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, परळ, दादर, अंधेरी, गोरेगाव, भायखळा, मस्जिद बंदर, कांदिवली, मालाड, बोरिवली, जोगेश्वरी इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात घरे, गाळे, हॉटेल्स, इमारती, इंडस्ट्रियल इस्टेट इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत. मुंबई महानगर पालिकेकडे अनेकदा सदर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी तक्रारी करण्यात येतात. पण अनेकदा या तक्रारीवर कारवाई करण्यात संबंधित अधिकारी टाळाटाळ करतात. तर काही वेळा कारवाई होण्यापूर्वी प्रकरण न्याय प्रविष्ट होते. तर काही वेळा पालिकेकडून कारवाई केली जाते. पण कारवाईचे प्रमाण कमी असते.

महापालिकेच्या एल विभागात साकीनाका येथील सफेद पूल येथील औद्योगिक परिसरात अनधिकृतपणे उभारलेले हॉटेलसाठीचे वाढीव बांधकाम, अंतर्गत भिंतीचे पाडकाम करण्यात आले. तसेच साकीनाका येथील 90 फिट मार्गावरील दोन विश्रामगृहांचे (डॉर्मेटरी) मजले तसेच साकीनाका (असल्फा मेट्रो स्थानक) येथील 18 खोल्या असलेली इमारत, 40 खोल्या असलेली अनधिकृत हॉटेल इमारत इत्यादींवर कारवाई करण्यात आली. उपाआयुक्त देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहाय्यक आयुक्त (एल विभाग) धनाजी हेर्लेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी 30 कामगार, 30 पोलीस, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंते, कनिष्ठ अभियंते सहभागी झाले होते. कारवाईसाठी आवश्यक पोकलेन, जेसीबी ही संयंत्रे आणि वाहने पुरवण्यात आली.


Edited by Abhijeet Jadhav