मुंबई : मुंबई पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर येथील जुन्या जलवाहिन्या बदलणे, दूषित पाणीपुरवठा रोखणे, अपुरा पाणीपुरवठा, पाणी गळती आदी पाण्याशी संबंधित अडचणी, समस्या दूर करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 309 कोटी रुपयांची विविध प्रकारची कामे करण्यासाठी कंत्राटदार नेमले आहेत. यानंतर आता दोन दिवसांनी मुंबई एमएमआरमधला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. (A review meeting was held to smoothen water supply in Mumbai MMR)
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुलभूत आणि पायाभूत सोईसुविधा केल्यामुळे मुंबईत गृहसंकुल येत आहेत. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा होण्याची गरज आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई एमएमआरमधला पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, सर्वांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आज 11 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये भातसा, काळू, शाही, देलजी, सूर्या, बाळगंगा, जांबिवली, सुसरी या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला गेला. या आढाव्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
हेही वाचा – Marathi Commentry : यापुढे महाराष्ट्रात राहून मराठीची गळचेपी चालणार नाही, हॉटस्टारविरोधात मनसे आक्रमक
एकनाथ शिंदे म्हणाले की, आजच्या बैठकीमध्ये जमीन अधिग्रहणाचे जे काही विषय प्रलंबित आहेत, त्यावर चर्चा झाली. ज्या परवानग्या युद्धपातळीवर मिळायल्या पाहिजेत, त्यासंदर्भात देखील सर्वांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण झाले पाहिजेत आणि वाढत्या एमएमआरमधील पाण्याची गरज पूर्ण झाली पाहिजे, याकरता आज महत्त्वाची बैठक पार पडली. भविष्यात नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर युद्धपातळीवर लवकर हे प्रकल्प पार पडावे, यासाठी आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास
दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले की, पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यानंतर फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मारकांचे जतन आणि विकास करण्यात येईल. प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर निधी पुणे महापालिकेला वितरीत केला जाईल. यामुळे स्मारकांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – Manoj Jarange : आम्ही दहशतवादी नाही, पंकजा मुंडेंच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया