मुंबई – महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून तर देशात दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील सरकार आहे. मात्र भाजप नेते आणि मंत्रीच बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित करत आहे. बांगलादेशी रोहिंग्यांवर कारवाईची मागणी करत आहेत. भाजप नेते किरीट सोमया यांनी तर राज्यात 2 लाखांहून अधिक बांगलादेशींनी फक्त घुसखोरी केल्याचा नाही, तर जन्मप्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर घुसखारांची संख्या किती प्रचंड असेल हा प्रश्नच आहे. या घुसखोरांवर कारवाईची मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मालेगावनंतर अकोला आणि अमरावती हे बांगलादेशींसाठी जन्मप्रमाणपत्र मिळण्याचे प्रमुख केंद्र बनले असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
मालेगाव, अकोला, अमराती रोहिंग्यांचे केंद्र
भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन राज्यात वाढत चालेलल्या बांगलादेशी रोहिंग्यांच्या घुसखोरीवर गंभीर प्रश्न उपस्थित केला. मालेगाव, अकोला आणि अमरावती हे घोसखोर बांगलादेशींसाठी जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रमुख केंद्र बनत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमय्या उद्या मालेगावला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ते म्हणाले की, “1000 बांगलादेशी रोहिंग्यांना खोट्या पुराव्याच्या आधारावर मालेगवामध्ये जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. मालेगाव पोलीसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला, दोन जणांना अटक झाली आहे, सध्या ते पोलिस कस्टडीत आहेत. मालेगामध्ये 3977 रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले.” असा दावा सोमय्यांनी केला आहे.
यानंतर अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 4800 रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले, त्यांच्याविरोधात तक्रार करणार असल्याचे सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनाही रोहिंग्यांच्या मुद्यावर माहिती दिली. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे सोमय्या म्हणाले.