मुंबई : भाजपचे सरकार हे जनतेसाठी नव्हे तर अदानींच्या फायद्यासाठी असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केले आहे. “गेली 2 ते अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार तसेच, गेल्या काही महिन्यांपासून भाजप सरकारने फक्त मुंबईसह महाराष्ट्राचे हाल केले आहेत. त्यांनी मुंबईकरांना लुटण्याचेच काम केले आहे. गेल्या काही महिन्यात पाण्याचा एक मोठा प्रश्न मुंबईतील प्रत्येक मतदारसंघातून समोर आलेला आहे. मुंबईचे पाणी नेमकं कुठे गेले आहे? सगळीकडे अजूनही गढूळ पाणी का येत आहे? असे प्रश्न आम्ही वेळोवेळी सरकारला विचारले आहेत. पण अद्यापही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.” असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. (Aaditya Thacekray criticized BJP Mumbai And Adani group)
हेही वाचा : Nitesh Rane : बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये; नितेश राणेंची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
“दुसरीकडे हवामानबदल हा मुंबईचा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. मुंबई आता दिसेनाशी होत चालली आहे. आता मुंबईत 100 मीटरपर्यंतचेही अंतर आपण पाहू शकत नाही. एकीकडे AQI (Air Quality Index) खराब होत चालला आहे तर दुसरीकडे मुंबई महापालीकेचे प्रदूषणावर कुठेही काम दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारकडून उपाययोजना तर सोडाच पण उत्तर द्यायलाही कोणी पुढे येत नाही.” असा गंभीर आरोप शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ” मुंबईकरांचे हाल झाले असून सगळीकडे रस्ते खोडून ठेवलेले आहेत. पण नागरिकांशी संवाद नाही,” अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
मुंबईकरांवर ‘अदानी’ कर येणार- आदित्य ठाकरे
शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा अदानींच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “अदानी समूह मुंबई गिळायला निघाले आहे. याचा अदानी समूहाला भाजपकडून सवलती देण्यात येत आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून आता आगामी काळात अर्थसंकल्प मांडला जाईल, तेव्हा मुंबईकरांनावर एक नवा कर लावण्यात येईल, तो म्हणजे ‘अदानी’ कर. आपण जे कर भरतो त्याचा फायदा हा अदानी समूहाला होत आहे.” अशी टीका त्यांनी यावेळी केली. “काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून देवनारचे डम्पिंग ग्राउंड घेतले होते, आणि ते धारावी पुर्नविकासासाठी दिले होते. म्हणजेच कचऱ्याच्या ढिगावर धारावीकरांना बसवणार असे अदानींनी ठरवले होते. त्यावेळीमुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता. त्यांचा विरोध याचसाठी होता की, मुंबईचे डम्पिंग ग्राउंडच जर गेले तर मुंबईच्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कुठे? पण तरीही त्यावेळच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी तो प्लॉट अदानींना दिला,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.