HomeमहामुंबईमुंबईAaditya Thackeray : एलफिन्स्टन पूल पाडण्याचे काम पुढे ढकला, आदित्य ठाकरेंची एमएमआरडीएला...

Aaditya Thackeray : एलफिन्स्टन पूल पाडण्याचे काम पुढे ढकला, आदित्य ठाकरेंची एमएमआरडीएला विनंती

Subscribe

125 वर्ष जुना म्हणजेच ब्रिटिश काळातील एलफिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आलेला आहे. परंतु, हा पूल पाडण्याचे काम पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती आमदार आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीला केली आहे.

मुंबई : 125 वर्ष जुना म्हणजेच ब्रिटिश काळातील एलफिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आलेला आहे. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या पुलाच्या पाडकामास सुरुवात करण्यात येणार आहे. परंतु, यामुळे मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईत आधीच अनेक पूल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद असल्याने मुंबईकरांना हव्या त्या ठिकाणी जाण्याकरिता विविध मार्गांनी वळसा घालून जावा लागतो. त्यात आता दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेल्या एलफिन्स्टन पुलाला पाडण्यात आले तर यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत. परंतु, या पुलाला पाडण्याचे काम पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे. (Aaditya Thackeray requests MMRDA to postpone demolition of Elphinstone Bridge)

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज हा शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पाचा भाग आहे. त्यामुळे एमएमआरडीएने हा पूल पाडून पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, याबाबतची माहिती समोर आल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी हे काम पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती एमएमआरडीएला केली आहे. याबाबतची पोस्ट त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे. “काल मी @MMRDAOfficial ला एल्फिन्स्टन पूल पाडण्याचे काम पुढे ढकलण्याची विनंती केली होती. कारण आता हजारो विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या कामामुळे त्यांना मोठा त्रास होऊ शकतो. सायन पूल ही बंद असल्याने सध्या टिळक पूल आणि डिलाईल पूलवर वाहतुकीचा भार येऊ शकतो,” असे आदित्य यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितले आहे.

हेही वाचा… Elphinstone Bridge : मुंबईकरांचे हाल होणार, 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडला जाणार

तसेच, “मी एमएमआरडीएला नागरिकांसाठी याबाबतचे सूचना देणारे पत्रक जाहीर करण्याची विनंती केली आहे. विशेषतः वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधून वाहतूक वळवणे आणि वाहतूक सुरळीत करणे ही एमएमआरडीएने सुनिश्चित करावे. त्यामुळे मला आशा आहे की, @MMRDAOfficial माझ्या नम्र विनंतीला सहमती देईल.” असेही आदित्य ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, एलफिन्स्टन पूल हा आता जीर्ण होऊ लागला आहे. या ब्रिजचे आयुष्य संपले असून सुरक्षिततेच्यादृष्टीने हा पूल पाडून याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ज्यामुळे एल्फिन्स्टन पूल पाडल्यानंतर या मार्गावरील वाहतूक टिळक ब्रिज (दादर) आणि करी रोड पुलाच्या दिशेने वळवण्यात येईल. परंतु, या दोन्ही पुलांवरून अवजड वाहनांची वाहतूक नेहमीच सुरू असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता असून प्रवासाचा वेळ देखील वाढणार आहे.